वेड भरारीचं

सहावी – सातवीचं वय असावं माझं. एका रात्री मी ते स्पष्ट पाहिलं… आश्चर्य, उत्सुकता, भीती यानं दुसरा दिवस नुसता भरून गेला होता! ती एकच रात्र नाही तर त्यानंतर लगेच्याच आणखी एका रात्री मला ते पुन्हा दिसलं होतं… पहिल्यावेळी दिसलं होतं तसंच स्पष्ट आणि एखाद्या उत्कंठावर्धक मालिकेसारखं… पुढच्या अनेक रात्री मला ते पुनःपुन्हा दिसत राहिलं, अधिकाधिक सरस अनुभवत राहिलं. ‘काय आहे हे? स्वप्न? की सुप्त इच्छा? हे खरं आहे की नुसता भास?’ अनेक ज्ञात-अज्ञात प्रश्नांनी माझं मन भरून गेलेलं… दिसणाऱ्या गोष्टींचा पुरेसा कार्यकारणभाव लावावा इतकं माझं वय प्रगल्भ नव्हतं…

रात्री बिछान्यावर पडल्यानंतर डोळा लागला रे लागला की ते माझा पाठलाग करत हजर व्हायचं. हो, म्हणायला स्वप्नच होतं ते – पण ‘भरारी मारण्याचं’. पहिल्यांदा हे स्वप्न मला पडलं ते – ‘मी पक्ष्यांसारखी हवेत उंच भरारी मारू शकते अशी जाणीव घेऊन’! तो आभास इतका प्रभावशाली होता की मी नकळत त्याकडे ओढली गेले. ‘मी खरंच उडू शकते? पंख वा पक्ष्यांसारखी उडण्यास उपयुक्त कोणतीही शारीरिक रचना नसताना मी खरोखर हवेवर अलगद तरंगू शकेन?’ माझ्या मनातल्या शंकासुराला व बावरण्याला त्या स्वप्नाने डोळा मिचकावलेला… जणू दिलासा दिला, एकदा करून तर बघ… निर्धास्त मनाने टाक विश्वास आणि हो स्वार… घे भरारी उंच आकाशी!!
माझी सुरुवात झाली ती घरात कोणी नाही बघून… डायनिंग मधलं सामान कडेला लावून मी हळूच हवेत एक उडीवजा झेप घेतली… अहो आश्चर्यम्! बाल हनुमानासारखी मी खरंच हवेत…! तोल सावरण्यासाठी पाण्यात संथ पोहोण्याच्या हातापायाच्या हालचाली करतो तशा चालू ठेवल्या आणि मी खरोखर हवेत तरंगू लागले. हळूहळू घराच्या सिलिंगजवळून ‘स्लो फ्लाईंग’ करत संपूर्ण घरात मी फिरून घेतलं. त्या पहिल्या स्वप्नानंतर दुसऱ्या दिवशी आरशात चमकलेला माझा चेहरा अजून आठवतो मला!
त्यानंतर ते स्वप्न कधीच थांबलं नाही… थोड्याफार रात्रींच्या फरकाने सातत्याने चालू राहिलं… भीड चेपली तशी मी घरातल्या सरावानंतर हळूहळू घराच्या बागेत उडण्याचा प्रयोग करून बघितला. वेळ पहाटे उजाडण्यापूर्वी किंवा रात्री झोपण्याआधी म्हणजे कोणाला दिसण्याचा प्रश्न नको. पण हे सारं स्वप्नातच! सराव उत्तम झाला तसा आत्मविश्वास मिळाला. घरासमोरचे खेळाचे मैदान, रोजचा शाळेचा रस्ता, इमारती, शहरातली माहितीची ठिकाणे सारीकडे अवकाश भ्रमंती करून झाली आणि मग वेड लागलं ते ‘भरारी मारण्याचं’!
नुसतं हवेत तरंगण्यापेक्षा मला त्या उडण्याचा ध्यास लागला. आपण किती जोराने जाऊ शकतो, वेग कसा सांभाळू शकतो, अचानक दिशा बदलून किंवा उंच आकाशातून जोराने जमिनीकडे झेपावत पुन्हा उंच झेप कशी घेऊ शकू याचाच विचार ध्यानीमनी वसू लागला… आणि त्यानुसार स्वप्नांमधला फेरफटकाही… मला आठवतात त्यानंतरच्या साऱ्या रोमहर्षक कसरती, त्यातला आनंद – एकावेळी तर कडाडत्या विजा अन् धुवांधार पावसातली सफर… कधी वेगवान उड्डाण सरावात चुकीने विजेच्या तारांना होता होता वाचलेली टक्कर, कधी उंचावर उडणाऱ्या घारींना दिलेले आव्हान… कधी शांत पाण्यावरून आपलेच प्रतिबिंब न्याहाळत किंचित पाण्याला स्पर्श करत तर कधी समुद्रावर उंच उसळणाऱ्या लाटांच्या सोबतीने केलेला प्रवास… कधी भर वस्तीत कोणाला माझी लागलेली चाहुल आणि स्वत:ला लपवताना उडालेली भंबेरी तर कधी वाट चुकल्याची धाकधुक आणि मग घरी परतण्याची तगमग…
‘हे नक्की काय होतंय मला?’ प्रश्न पडायचा… वाटे, कोणाला सांगू की नको? आई काय म्हणेल? हसणार तर नाही? विचारांपायी ५-६ वर्ष ते गुपित माझ्या जवळच ठेवलेलं. मग मात्र त्या अज्ञाताच्या प्रवासात आई माझी मैत्रीण झाली. ‘दिसणारी गोष्ट वाईट तर नक्कीच नाही… तटस्थेने पाहत राहा, कधीतरी उलगडेच की हे कोडे…’ तिने आश्वासक शब्दात सांगितलेले. पुढे एका वर्षी ‘जोनाथन सीगल’ ची कहाणी हाती लागली आणि मी ते पुस्तक अधाशासारखे वाचून काढले… गेली दहा अधिक वर्षे जे स्वप्नी वसत होते तेच तर प्राथमिकता ‘जोनाथन’ च्या बाबतीत घडू लागलं होतं! तेव्हापासून जिवाची होणारी घालमेल कमी झाली पण येणारे अनुभव मात्र सातत्याने येत राहिले.

२० नोव्हेंबर २०१०. सकाळी मी जंपर विमानाच्या दिशेने निघाले होते. अंगावर हार्नेस. सोबत कॅमेरामन आणि पाठीवर बंद पॅराशूट लटकवलेला एक मदतनीस… My first tandem sky jump!!… ‘स्काय डायविंग’ एकदा तरी करायचंच असं माझ्या मनात बरेच दिवसांपासून घोळत होतं… का ते नक्की माहित नाही पण कदाचित धाडसीपणा आवडतो त्यामुळे असेल. आमचं विमान १०,००० अधिक फूट उंचीवर पोहोचलं आणि हवेतच थांबलं…skyjump-3 उडी मारण्यासाठी मी विमानाच्या दारात आले. थंड वाऱ्याचा स्पर्श झाला. मदतनीसाने सांगितले, ‘३ आकडे मोजले की हवेत झोकून द्यायचं’… skyjump-1१, २, ३…

खोलवर मुक्त श्वास भरून घेत कोणत्याही मानसिक चलबिचलीशिवाय मी अलगद स्वतःला झोकून दिलं. काही क्षणात गुरुत्वाकर्षणाच्या प्रचंड ओढीमुळे खाली खेचले जाण्याची जाणीव झाली. वेगावान प्रवास सुरु झाला आकाशातून जमिनीकडे. हवेशी घर्षण कमी करण्यासाठी हात असे खांद्यातून आडवे लांब केलेले… एखाद्या पक्षाने हवेत तरंगण्यासाठी पंख पसरावेत तसं… आणि जाणवलं…

skyjump-2 ‘I was literally flying in the air!!
मी खरोखर उडत होते…’

त्यादिवशी गेली दीड दशके पाहिलेलं माझं ‘भरारी मारण्याचं स्वप्न’ त्या ४५ सेकंदात मी काहीअंशी प्रत्यक्षात जगले… पॅराशूट उघडल्यानंतर लिलिपुट दिसणाऱ्या जगाला न्याहाळत मी हलकेच जमिनीवर उतरले ती ‘अविस्मरणीय क्षणां’ची शिदोरी घेऊन. रात्री झोपले, त्या स्वप्नाला खूप काही सांगायचं मनात ठेवून… मला अशी काही गाढ झोप लागली की कळलंही नाही – माझं इतकी वर्षे पिच्छा पुरवणारे ते स्वप्न सस्मित आणि अबोलपणे केव्हाच अज्ञाताकडे निघून गेलेलं… पुन्हा कधीही न परतण्यासाठी!
.
~ सायली मोकाटे-जोग
नोव्हेंबर २०१५

One thought on “वेड भरारीचं

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s