‘साक्षगंध’

“तुला हा मार्चमध्ये फोटो दाखवला होता… आठवतोय?”
“हं…”
“नुसतं ‘हं’ काय?”
“’US चा मुलगा आहे, यावर्षी यायला सुट्टी नाहीये’ – वाला तोच नं?”
“हो. त्याच्या घरचा फोन आला होता. नोव्हेंबरअखेर येतोय म्हणे.”
“मी बहुतेक कॅनडाला जातेय…”
“काssय? कधी? नक्की तारीख कळली आहे का?”
“नाही अजून. व्हिसा आला की कळेल.”
“अय्या! मग?”
“बघू…” 😕

“बरं झालं तुझं व्हिसाचं लांबलं ते! तो पुण्याला येतोय परवा इंद्रायणीनी…”
“तुला कसं कळलं?”
“त्याचे वडील फोनवर बोलताना म्हणत होते… शिवाजीनगरला उतरून मावशीकडे जाणार आहे…”
“मला का सांगतेयस हे?”
“सोलापूरला येणाऱ्या त्याच इंद्रायणीत तुझ्या लाडक्या भावाला सोडायला तू जाते आहेस ना उद्या शिवाजी नगरला?…”
“हो…”
“मग स्कार्फ बांधून Activa सह उभी राहा नं थोडावेळ स्टेशनबाहेर…”
“काssय?” 😮
“अगं, बघायला मिळेल नं, officially भेटायच्या आधी?”
“काहीही हं…”  😥
“मी म्हणते काय हरकत आहे??”
“हरकत काहीच नाही… चांगली आहे आयडिया!!…” o_O
“आत्ता कस्सं??”
“….” 🙄

“दिसला?”
“न दिसायला काय? गर्दीत तोच एकटा ६ फूट होता.”
“मग?”
“मग काही नाही…”
“तरी?”
“फोटोत दिसतोय त्यापेक्षा जास्त गोराय…”
“काळा गोरा राहू दे गं… बाकी कसा वाटला?”
“स्टेशन बाहेरच्या सगळ्या अंगावर येणाऱ्या रिक्षावाल्यांना टाळून थेट चालत बाहेर गेला. नंतर बसस्टॉप वरून पुढे डावीकडे वळला.”
“पुढे?”
“पुढे???… माझ्यासारख्या सभ्य मुलीने एखाद्या मुलाचा अजून किती पाठलाग करायचा? तिथून घरी आले मी…” 😐

“भेटलात?”
“हं…”
“तासभर म्हणत जवळपास ४ तास गप्पा झाल्यात… आम्हाला काहीतरी कळू द्या की सविस्तर…”
“हूं… ऐका. मावशीचं घर बाजूच्याच गल्लीत असूनही बरखुद्दार रिक्षा करून आले ते ही साडे पाच मिनिटे उशिरा! पाऊस पडत होता… दोघे छत्र्या घेऊन CCD च्या दारात भेटलो. आत गेलो. कॉफी प्यायली… नंतर आपापल्या वाटेने घरी…”
“आगावपणा बास बरं का? काय बोलतात आणि कसा वाटला?”
“ठीके.”
“काय खेचताय गरिबाची… सांगून टाका पाहू एकदाचे…”
“आई!!”
“सांग की गं, please…”
“कॉफीचं बिल त्यानं दिलंय… २-४ दिवसात फोनही तोच करेल…” 😎
“ओ होss… दे टाळी! फोटो पाहिल्यापासून सारखं मनात वाटतंय… हाच माझा जावई होणार… टॅs टॅ टॅ टॅ टॅsss टॅs टॅ…..”
“अ गं… ??…”

(दोन दिवसांनी)
“काय गं? आज आता ऑफिसमधून फोन केलास?”
“दुपारी लंच नंतर फ्रेशर्सचे फोन इंटरव्ह्यू घेत होते. त्यात माझा मोबाईल वाजला… अन्नोन नंबर होता पण तंद्रीत उचला मी.”
“कोणाचा फोन होता?”
“त्याचा…”
“अरे व्वा!! CCD त विसरलीस ते विचारलंस का?”
“हो…”
“मग काय म्हणाला?”
“म्हणाला, ‘निर्व्यसनी’चा नक्की अर्थ काय तुझ्यामते? I am a social drinker! ‘सोसंल’ इतकंच घेतो… तरीही तुझी तीच ठाम अट असेल तर काय… सोडूया मग आता…”
“काय सांगतेस!! आहेच माझा जावई गुणाचा!”
‘होणारा’ जावई म्हण. परवा डोंबिवलीला जातोय आपण त्याच्या घरी…”

त्यानंतरच्या तीन दिवसांनी, बरोबर सात वर्षांपूर्वी ‘ती’ आणि ‘तो’ विवाह बंधनात अडकण्याचे वचन घेऊन मोकळे झाले!! 😀 ❤
engagement-sasa
.
~ सायली मोकाटे-जोग
२७ नोव्हेंबर २०१६

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s