चित्रभेट

देवदत्त देणगी वगैरे नसली तरी चित्रकला मला लहानपणापासून आवडायची. एलिमेंटरी, इंटरमिजिएटला B Grade (द्वितीय श्रेणी) घेऊन मी उत्तीर्ण झाले. इंजिनिरिंगला पहिल्या वर्षी ग्राफिक्स वगैरे विषय होता. मात्र शाळेनंतर आठवणीने चित्रकलेचं आकर्षण वाटावं असं अभ्यासक्रमातून काही कारण नव्हतं.

आयुष्यात… बालपणी ‘आयुष्य’ वगैरे असं वाटत नसतं किंवा तेवढं कळतही नसावं पण पुढे मोठे झाल्यावर मागे वळून बघताना ‘आयुष्यात’ असा शब्द फुटतो खरा… तर आयुष्यात काही घटना घडतात… ‘नात्यांमध्ये व्यवहार वा कोणाला आर्थिक मदत करायच्या भानगडीत शक्यतो पडायचं नाही कारण या कलियुगात पैसा आणि नाती दोन्ही गमवायची वेळ येते’… हे शहाणपण मी माझ्या आई-बाबांच्या उदाहरणावरून शिकले… (आणि त्याची भक्कम किंमत आम्ही अनेक वर्ष ‘आपल्याला कोणी नाही’ अशी सल घेऊन जगत चुकवलीही. अर्थात अशी एकटेपणाची सवय असावी म्हणजे खरेपणाची, विश्वासाची, माणसांची, नात्यांची किंमत अधिक राहाते आणि कुठल्या कसोटीच्या क्षणी योग्य निर्णय घेताना एकाकी पडण्याचं भय विचलित करत नाही. असो!)
माझी आई सगळ्या भावंडांमध्ये धाकटी. तिची एक मोठी बहीण – ‘विजया’ म्हणजे माझी चित्रकार ‘विज्जामावशी’…  फाईन आर्ट आणि कमर्शिअल आर्ट. आमच्या वाढदिवसांना ती स्वतः रंगवून फार सुरेख भेटकार्ड पाठवायची… तिच्या कामाचे, संसाराचे व्याप सांभाळून. कधी फुलांची पखरण, कधी मंजुळ गाणारी रंगीबेरंगी चिऊ, वेगवेगळी कार्टून्स तिच्या चित्रशैलीत झोकात रेखाटलेली असायची… कधी वाढदिवस निघून गेला तर कॅलेंडर, घड्याळाने तारीख-वेळ चुकवून कशी फजिती केली ते चितारून पाठवलेलं असायचं तर कधी ‘I will never ever forget your birthday again’ असं शिडी घेऊन फळ्यावरती जणू १०० वेळा लिहून शिक्षाच घेत असल्याचा खट्याळपणा… सुंदर संदेश देणारी, कधी खळखळून हसवणारी तर कधी अंतर्मुख करणारी अशी कल्पक! तिचं प्रत्येक भेटपत्र बोलकं, जिवंत आणि ‘या हृदयीचं त्या हृदयी’ भरभरून शुभेच्छा देणारं!! आजही आम्ही ती सगळीच्या सगळी अगदी जपून ठेवलेली आहेत… तिच्यासोबतच्या प्रेमळ आठवणींसह! ती वर्षाकाठी आमच्याकडे येणं आणि तिची उबेची भेटकार्ड दोन्ही थांबली… का ते आजही मला माहिती नाही. पण तेव्हापासून मनात एक असह्य पोकळी निर्माण करून गेली!
‘… संगीत टूटे दिल को जोडता है।’… मिशन कश्मीर मधलं गाणं शंकर महादेवन यांनी गायलेलं. मला वाटतं, ‘चित्रकला’ ही रिकाम्या कोपऱ्याला रंग देत असते मग कोपरा भिंतीचा असो वा मनाचा! दुखऱ्या भावनांना हलकं करत अलगद ती कागदावर उतरते. निदान माझ्या बाबतीत तरी तसंच घडलं असावं. मी रंगवायला लागले तिचीच भेटकार्ड घेऊन. जमायचीच नाहीत पहिल्यांदा तिच्यासारखी. पण प्रयत्न करत राहिले. नव्याने कोरे रंगही आणले. आजूबाजूला कोणाच्या वाढदिवसाचं निमित्त मिळालं की भेटकार्ड तयार करायचे. तिचं ते ‘लुकडं’वालं भेटकार्ड (Looked and looked and looked, but couldn’t find one for someone special like YOU; so made it by hand) तर मी कितीतरी वेळा रंगवलं होतं! तिची मूळ कलाकृती न पाहिलेल्यांमध्ये माझं रंगकाम खपून जात असावं. बघणाऱ्यांच्या प्रतिसादापेक्षा ते बनवणं हे त्यावेळी मावशीच्या सहवासाची भावना द्यायचं आणि माझ्यासाठी ते पुरेसं होतं. पुढे महाविद्यालयांमध्ये आर्ट गॅलरीत लटकवायला म्हणून हौशीने काढली गेली काही. नोकरीसाठी पुण्यात असताना लागलेली चित्रकलेची प्रदर्शनं आर्वजून पाहायची त्यावेळी ‘कला म्हणून माझी चित्रकला मी जोपासावी, वाढवावी’ अशी इच्छाही निर्माण झाली पण नियमितता राहून गेली.

Sayali_painting_SonFule

सकाळी आठवणीने चित्रकलेच्या जुन्या वह्या निघाल्या. अनेक चित्रांवरून हात फिरवला, त्याखालच्या तारखा वाचल्या. सोलापूरला घरी असलेल्या चित्रांचे फोटो शोधून पाहिले. काढण्या-रंगवण्यासाठी म्हणून जमा केलेली बरीच छापील कार्ड, कात्रणे चाळली. तिचं ते आकाशी-निळ्या फुलांमध्ये फुललेली पिवळी धम्म सोनफुलं… दुसऱ्या वर्षाला असताना काढलं होतं मी ते!

फुलांनी ओसंडून वाहणारी तिची परडी मी माझ्या साखरपुड्यावेळी रंगवली होती… आता पुन्हा चित्र काढायला सुरुवात करूया, मी मनाशीच ठरवलं. मागच्यावेळी हॉबी लॉबीत कॅनव्हास हातात धरला होता तेव्हा मुली डोळयांसमोर आल्या आणि ‘अजून काही दिवसांनी’ म्हणत तो खाली ठेवला होता. आता मात्र घरातला एक कोपरा चित्रकलेसाठी. सगळं जमवून तिथे ठेवायचं आणि जेव्हा वेळ मिळेल तसं, तितकं रंगवायचंच… बस्स ठरलं!

आज १३ डिसेंबर… विजयामावशीचा ८० वा वाढदिवस! तिला कधी प्रत्यक्ष भेटू शकेन की नाही हे मला माहिती नाही. तिच्या भेटकार्डातली माझी आवडती मोजकी काही मी लग्नानंतर माझ्यासोबत हट्टाने आणलीत, ती काढली. मागची कितीतरी वर्षं तिला माझ्या परीने भेटू पाहते तशीच आजही भेटले… तिच्याच चित्रकलेतून… तिची – माझी अशी ही ‘चित्रभेट’… तिच्या चित्रातून व्यक्त होणाऱ्या भावनेसारखीच!
माझ्या सर्वात लाडक्या भेटकार्डावरती तिने रंगवलेल्या फुलांमधून नजर फिरताना नेहेमीसारखंच पण नकळत मनाच्या तारा छेडत कानात पुन्हा घुमलं…
“Flowers seems to speak
the words
we often can not find!!”
 
.
~ सायली मोकाटे-जोग
डिसेंबर २०१७

 

2 thoughts on “चित्रभेट

  1. सुंदर लिहिलयस सायली… तुझ्या लहानपणी तुला पाहिलं होतं…त्यानंतर फक्त आठवणी व कधीतरी फोटोतनं… आज पहिल्यांदा एका वेगळ्याच सायलीची ओळख झाली…छान वाटलं…परिस्थिती व विचार दोन्ही जुळणारे…मी सुद्धा तसाच होरपोळलोय….नात्यातल्या धगीत… नात्याची वीण घट्ट कधी झालीच नाही.. लहानपणापासून एकुलतं एक अपत्य असल्याने भावा-बहिणींच्या प्रेमाला तसा पारखाच…तुझ्या लेखाने माझ्याही काही कटु आठवणींना उजाळा मिळाला.. असो.. कधी भेट झाली तर आवडेल… शुभेच्छा..
    —श्रीनिवास जोशी…दहिसर,मुंबई…

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s