गड्यांनो, फेकुनी द्या दप्तरे !…

१९९०-२००० च्या दशकातलं महाराष्ट्रातलं शिक्षण हे अगदी पु. लं. च्या ‘बिगरी ते मॅट्रीक’ सारखं खडतर (राकट मास्तर आणि त्यांच्या छडीचा भरपेट मार) असं निश्चितच राहिलं नव्हतं. त्यात थोडी मुलायमता आलेली होती. स्वातंत्रोत्तर भारताची मोकळी मानसिकता होती. अर्थात ‘मेकाले’ प्रणालीत फारसा फरक सरकारकडून पडलेला नसला तरी शहरी सुखवस्तू घरातले पालक मुलांच्या अभ्यास-प्रगतीकडे जातीने लक्ष देऊ लागले होते. धाक, शिक्षा हे होतं पण तरीही शिक्षकांविषयीची अनाठायी वाटणारी भीती कमी झाली होती.

विद्यार्थी-पालक-शिक्षक हा त्रिकोण एकमेकांशी जुळवून गोडीने नांदायचा. परीक्षा आणि गुण हीच काय ती गुणवत्तेची कसोटी. मी ज्या शहरात वाढले तिथलं हे तेव्हाचं शैक्षणिक वातावरण. पालकांच्या जोडीने शिक्षकही मुलांची जिज्ञासा वाढीस लागावी यासाठी प्रयत्न करत… सराव परीक्षा, जास्तीचा अभ्यास आणि त्यामुळे या सगळ्याबरोबर पाठीवरचं वाढलेलं दप्तराचं ओझं!

या पाऊलवाटा दूर दूर धावती
टेकड्यावरुनी आम्हा बोलाविती
त्या माळावरती रानफुले हासती
पाहूया चला ही तरंगती पाखरे || गड्यांनो फेकुनी द्या दप्तरे! …

वर्ष नववीचे. पुढच्या वर्षी दहावी म्हणजे नववीच्या उन्हाळा सुट्टीपासूनच दहावीच्या शिकवण्या आणि अभ्यासक्रमाची लगबग. नेमक्या अशा मोक्याच्या इयत्तेत कुणी म्हणावं – “गड्यांनो फेकुनी द्या दप्तरे! …”?
अर्थात निमित्तही तसंच होतं. वर्ष-दीड वर्षात आम्ही शाळेबाहेर पडणार होतो. शाळेचे सीमित विश्व विस्तारणार. आपण एका सुखी कुटुंबात जन्मलो. आई-बाबा, नातलग, राहण्यासाठी सुरक्षित छप्पर आणि चांगलं शिक्षण देणारी शाळा… पण आपल्या समाजात एक उपेक्षित गट आहे ज्यांच्याकडे अन्न-वस्त्र-निवारा या मुलभूत गरजांसाठीच संघर्ष आहे मग शिक्षण, सुख, सुरक्षित आयुष्य तर दूरच… त्याची छोटी झलक आणि त्याबरोबर निसर्गाच्या छायेत स्वावलंबनाचे अनुभव आमच्या शालेयीन सृजन मनात रुजावे, पुस्तकी ज्ञानाबाहेर पडण्याचा जाणून प्रयत्न…  म्हणून शाळेने आयोजलेले ‘तंबू शिबीर’.
शिबिराच्या नावाप्रमाणेच दूर शेतमाळावर तंबू बांधून राहायचे, राहण्याच्या जुजबी सोयी आणि बाहेर झाडाखाली चुलीवर स्वयंपाक! सकाळी व्यायाम, दुपारी चर्चासत्रे तर मधून शेतावर अभ्यास फेरी, शेकोटीबाजूला जेवण, आणि मग रात्री काही नेमलेल्या मुला-मुलींची आळीपाळीने गस्त… सारी कामे आम्ही स्वतः करायचो. शहरात राहून नदीच्या, विहिरीच्या थंडगार पाण्याची वा विशाल वड-चिंचेच्या झाडाच्या सावलीची मजा अनुभवता येत नाही. पहिल्या १-२ दिवसात अवघड वाटलेलं हे शिबीर आम्हाला हळूहळू आवडू लागलं, आपण लहान-सहान गोष्टीची किती तक्रार करत जगत असतो ते जाणवलं आणि मग…

तो दूर उभा वड पारंब्या हलवीत
तेथेच रंगते पाण्याचे संगीत
पलिकडल्या बाजूस आहे का माहित
ते झुळझुळणारे निळे हासरे झरे ||
आकृत्या बेरजा असू द्या फलकावरी
अक्षरे राहू द्या पुस्तकीच ती बरी
नभ निळे पाहिले आहे का कधीतरी
नवरंगांनी नटलेले साजिरे || गड्यांनो फेकुनी द्या दप्तरे! …

गाण्याचे बोल आम्हाला शेत परिसरात फिरताना नेमके उमजू लागले. ती वड-पिंपळ-चिंचेची झाडं आमच्या कुटुंबाचाच भाग आहेत अशी आमची धारणा झाली. शेतातले पाण्याचे ओहोळ आमच्याशी बोलू लागले. सकाळी पाच वाजताच्या व्यायाम-सत्रानंतर जेव्हा प्रथम सूर्यदर्शन झालं, क्षणभर मी थबकून गेले. असा उगवतीचा मोठा मोहक तप्त केसरी गोळा मी कधी पहिलाच नव्हता. एरवी शहरात रात्री दिव्याच्या उजेडाने आकाशात मोजके दिसणारे तारे… कुबेराने मुक्त रत्नांची जणू उधळण केलेली असावी एवढे चमकदार चांदणे मी त्या रात्रींमध्ये आकाशभर लुकलुकताना पाहिले. टपोऱ्या दाण्यांनी भरलेले ज्वारीचे कणीस – त्याचा हुरडा, झाडावर चढून खाल्लेली जांभळे, शेणात हात घालून सारवलेली चूल, भाकरी थापण्याचा केलेला प्रयत्न, चुलीजवळ डोळ्यात गेलेला धूर, एकमेकांच्या सहकाऱ्याने केलेलं श्रमदान, शेतात हरवलेली वाट शोधताना उडालेली भंभेरी आणि गस्त घालत जागताना काळोखात पाहिलेले काजवे… अगदी मंतरलेले दिवस!


ते इवले इवले गवत कसे हासते
कधी वाऱ्यासंगे भूमीवर लोळते
ते चला पाहूया दिसते किती हासरे ||
तो रिमझिम पाऊस मस्त किती बरसतो
कधी दणदण करुनी सर्वांना भिजवतो
कधी वीज चमकुनी फोटो तो काढतो
करू दोस्ती खाऊया गारांचे ते गरे ||
तो वारा फिरतो शीळ मुक्त घालतो
कवडसा खोडकर भिंतीवर सरकतो
कुणी पतंग करुनी मेघांचे उडवितो
नशिबात अमुच्या का ही प्रश्नोत्तरे? … गड्यांनो फेकुनी द्या दप्तरे! …

या गाण्याच्या ओळी गात – छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायचा, निसर्गाच्या किमयांची नुसतीच मौज नव्हे तर त्या निसर्गाशी दोस्ती करायचं हे सारें तिथे शिकलो… केवळ पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त अनुभूती तर मिळालीच आणि “असं का?” हे चिंतन सुरु झालं.
“फेकुनी द्या दप्तरे!…” सांगणारे हे श्री. आ. ना. पेडणेकर यांचे गाणे आम्हाला खूप काही शिकवून गेले. त्या तंबू शिबिराने विचारांची दिशा बदलवून टाकली. आहे त्या परिस्थितीत जुळवून घेणं, परीक्षेतल्या गुणांपेक्षा अभ्यास मूळापासून कळणं, तो समजावून घेणं – जास्त महत्वाचं हे गवसलं. आज घोकंपट्टी, परीक्षा, गुणांची कसरत, शिकवण्या, महागडी विद्यालये, त्यांचे प्रवेश आणि त्या अनुषंगाने येणारी जीवघेणी शिक्षण-स्पर्धा या सगळ्याचा ताण – त्या बोजड दप्तरासारखी – जी मुले मानेवर घेऊन जगत आहेत त्यांना आणि त्यांच्या पालकांसाठी परत एकदा म्हणूया… “गड्यांनो, फेकुनी द्या दप्तरे! …”
.
~ सायली मोकाटे-जोग
जुलै २०१२

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s