उंची

earthमाझ्या आठवणीप्रमाणे उंचीचं वेड मला लहानपणापासूनच लागलं असावं. पक्षाप्रमाणे उंच भरारी मारत आकाशाला गवसणी घालायचं स्वप्न अनेक रात्रींतून मी स्पष्टपणे पाहिलेलं. स्काय डायविंगमध्ये १०,००० फुटावरून उडी मारताना केवढा आनंद भरून आला होता म्हणून सांगू? थंड हवेतून ढगांमधून खाली येताना बोन्सायप्रमाणे दिसणारा निसर्ग आणि लिलिपुटमधली माणसे… पॅराशूट उघडून हवेवर तरंगण्यातली मौज शब्दात नाही सांगता येणार! भीतीचा लवलेश सोडाच पण इच्छापूर्तीचा, त्या उंचीवर जाण्याचा आनंद भरून होता.

कळत्या वयापासूनचा विमान प्रवासही माझ्यासाठी असाच विशेष असतो. खूप प्रवास होऊनही आजही मला खिडकीची जागा पकडायची असते. लहानपणीच्या परीकथेतले ते पांढरेशुभ्र ढग – पिंजलेला कापूसच जणू! कधी विरळ, कधी फेसाळ आणि लांबच लांब पसरलेला… विमान त्या ढगांवरून जाऊ लागलं की मन वेगळ्याच विश्वात हिंडू लागतं. त्या ढगांवरचं ते मोठं निळंशार आकाश… त्या आकाशावर दिवसा आपल्या सोनेरी रंगानं मिरवणारा तो भास्कर, कधी भाग्यवान क्षणी ढगांवर दिसणारं पूर्ण वर्तुळाकार सप्तरंगी इंद्रधनुष्य, मेघांच्या विविध आकार-रंगांची चित्रकला आणि रात्री गडद आभाळाच्या प्रांगणात अगणित माणिक तारकांचा तो लुकलुकता मोहक सडा!
१ फेब्रुवारी २००३… कल्पना चावलाच्या अपघाती मृत्यूच्या बातमीनं त्यावेळी चुकचुकलेलं माझं मन या उंचीच्या वेडानं मात्र पछाडून जातं… या अंतराळवीरांना अनुभवता येणारं अवर्णनीय आजमावण्यासाठी मग स्पेस सेंटरने टिपलेली छाया-चलचित्रे बघण्यात मी हरवून जाते… विलोभनीय पृथ्वी आणि त्यावरचं हे विविधतेने नटलेले जीवन-विश्व! या चैतन्याला साक्षीदार असणारं ते आकाश, त्यापलिकडचं अनंत मला नकळत खुणावू लागतं… जीवसृष्टीचा, अनेक अनुत्तरीत प्रश्नांचा अभ्यास त्या जीवरहित उंचीवरून करताना काय वाटत असेल या अंतराळवीरांना? स्वतःच्या जीवाची काळजी तरी उरत असेल?
मृत्यू हा अटळ… पण तो कसा आला हे जास्त महत्वाचं. कल्पना चावलाचा म्हणूनच हेवा वाटतो मला. काय म्हणता, माझ्यासारख्या सामान्य मुलीला उंचीचं काही भय? छे, अशा उंचीवरून येणाऱ्या मरणावर मी नेहमीच फिदा आहे…!
.
~ सायली मोकाटे-जोग
एप्रिल २०१५

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s