मराठी (प्रयोग)शाळा

पुंडलिक वरदे हरी विठ्ठल
श्रीज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय!
सब संत की जय!
जय जय रघुवीर समर्थ!!
बाप्पा जय जय !

गेले तीन-एक वर्षे पाळणाघराच्या (डे-केयरच्या) गल्लीत शिरतानाचा हा आमचा गाडीत ठरलेला गजर… अर्थात याची सुरुवात झालेली असते सकाळी उठल्या उठल्या ‘कराग्रे वसते…’ आणि प्रातःसमयीच्या श्लोकांपासून. करियर, पैसा, भटकंती ही सगळी एकेकाळची प्राथमिकता बाजूला राहून ‘होणारे आई वडील’ या भूमिकेत गेलो की एक स्वाभाविक प्रश्न मनात पिंगा घालू लागतो. एक सच्चे मराठीप्रेमी, मराठी भाषिक या नात्याने अमेरिकेत मूल जन्माला घालून वाढवताना त्याला आपली भाषा, संस्कृती कशी देऊ शकू? अमेरिकेत पूर्वी येऊन वसलेल्या अनेकांशी आवर्जून या विषयावर चर्चा करताना मला अनेक उपयुक्त सल्ले, अनुभवाचे बोल, शंकांना उत्तरे तर कोणाकडून मुलांना घरात मराठी शिकवण्याचं त्यांनी स्वतः निर्मित केलेलं सुंदर साहित्य मिळालं. मग त्यात (प्रायोगिक) युक्त्यांची भर घालत आम्ही आमच्या पिल्लांना ‘मराठी संस्कारांचं बाळकडू’ द्यायला लागलो, जाणतेपणे ‘मराठी धर्म’ बाणवू लागलो.
मुळात ‘धर्म’, ‘संस्कार’ म्हणजे काय? ‘धारण करतो’ तो धर्म आणि (सम्+कृ) अर्थात ‘चांगले कृत्य करणे’ म्हणजे संस्कार! याअर्थी मुलांना मराठी घडवणं ही गोष्ट एखादा शनिवार-रविवार तासभर पाटी पुस्तक घेऊन हंगामी खिचडी पकवायची बात नसून ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सदा सर्वकाळ आचारायची चीज आहे हे आधी उमगलं. मोठे झाल्यावर, महाराष्ट्रा-देशाबाहेर राहताना आपण लहानपणीच्या सुंदर सवयींकडे – ज्यात साधं संध्याकाळचं शुभंकरोती असेल, जेवणाआधीची प्रार्थना असेल अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींकडे कळत नकळत काणाडोळा करायला लागलेलो असतो. त्यामुळे सुरुवात स्वतःपासून दिनक्रम डोळसपणे बदलून करायला हवी. यात कोणत्याही मोठ्या वेळेच्या गुंतवणुकीची गरज नाही. एकदा का आपल्यात ते रोज दिसलं की मुलांमध्ये आपसूकच भिनत जातं. रोजचे श्लोक, अंघोळीनंतरची देवपूजा, आरती (अगदी वेळ नसेल तर साधा वाकून केलेला नमस्कार), पाळणाघराला वा शाळेला सोडायच्या वाटेवर सकाळच्या प्रार्थना, एखादं भजन, गाणी ही आपली आणि आपल्या मुलांची प्रभात मंगलमय करुन टाकतात.
लहान मूल म्हणजे कोरी पाटी. मातीचा इवलासा गोळा. त्याला हवा तसा आकार द्यावा. मनुष्यासाठी भाषा हे प्रथम संवादाचं आणि त्यानंतर शिक्षण, अभिव्यक्ती व संस्कारांचं प्रभावी माध्यम. जन्मल्यापासून कानावर पडलेली भाषा मुलं शिकतात. पण मुळात बहिरी असलेली व्यक्ती मुकीही निपजते तर असे का? कारण बोलण्यासाठी आवश्यक तो ध्वनी त्याच्या कानावर पडलेलाच नसतो. परदेशात मुलांना मराठी बोलताना येणारा ऍक्सेंट वा सुस्पष्ट शब्दोच्चारांचा अडसर याचे हेच सोपे उत्तर आहे. दीड दोन वर्षांपासून मुले बोलायला लागली तरी श्रवणभक्ती आईच्या पोटात असल्यापासून चालू झालेली असते. अमेरिकेत मुलांच्या कानावर दैनंदिन मातृभाषा आई-वडिलांखेरीज कितीशी पडणार? ४०-५० वर्षांपूर्वी इथे स्थलांतरित झालेल्या मराठी कुटुंबांपेक्षा आताची आमची पिढी तंत्रज्ञान आणि संपर्काची साधने हाताशी बाळगून आहेत हे वरदानच म्हणावे लागेल – फक्त त्याचा योग्य वापर जमायला हवा!
भगवदगीतेपासून मनाच्या श्लोकांपर्यंत अनेक संस्कृत-मराठी श्लोक, मराठी-हिंदी गाणी, बडबडगीतं, शास्त्रीय संगीत असे अनेक संच आमच्या लेकीसाठी आम्ही घरात सातत्याने लावतो. सकाळी उठण्याचा गजर ते घराबाहेर पडेपर्यंत आणि पुन्हा घरी आल्यानंतर रात्रीच्या अंगाईपर्यंत हा सगळा वेळ सुसंगत, निवडक असा संगीतमय, ध्वनिमय राहील याकडे कटाक्षाने लक्ष देतो. परिणामतः आमची चिमुकली दीड वर्षांपासूनच किलबिलू लागली. दोन सव्वादोन वर्षांची होती तेव्हा कोणाशी बोलताना माझ्या लेकीने फोन पळवून त्यांना पूर्ण बालगीत किंवा एखादं मराठी गाणं ऐकवून चकितही केलंय. ती आता साडे चार वर्षांची आहे. पण ‘ग’ – ‘घ’, ‘ढ’ – ‘ध’, ‘न’ – ‘ण’, ‘ल’ – ‘ळ’, आणि ‘श’ – ‘ष’ हे सगळे उच्चार तिला कळतात, बोलताही येतात. कुठेही बाहेर गेलं, हळदी कुंकू असेल वा काही कार्यक्रम… “अय्या, काय छान स्पष्ट मराठी बोलतेय!” असं कौतुकाने ऐकायला मिळतं त्यावेळी होणारा आनंद वेगळाच असतो.
आमचे घरातले खेळ निरनिराळे असतात. ‘आईचं पत्र हरवलं…’, ‘डोंगराला आग लागली पळापळा…’, ‘शिरा पुरी पुढच्या घरी’, झिम्मा इतकंच काय पण पूर्वीच्या दूरदर्शनच्या जाहिराती, सुंदर हिंदी गाणीही… ‘हमारा बजाज’, जलेबीS म्हणणारा धाराच्या जाहिरातीतला मिश्किल मुलगा, ‘चुलबुली’ ते ‘पूरब से सूर्य उगा’, ‘सुरज एक चंदा एक’, ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ बरोबर अनेक मराठी स्फुर्तिगीते! भातुकलीत पिझ्झा, कुकीजच्या जोडीला पोहे, उपीट, इडली, थालीपीठ, वरणभात, लिंबू सरबत तर कधी चिवडा, लाडू असा फराळही बनतो. सार्वजनिक वाचनालयाची (पब्लिक लायब्ररीची) मुलांची आणलेली पुस्तके भलेही इंग्रजी असोत, आम्ही मात्र ती मराठीत वाचतो. मग त्यातल्या Caillouचा होतो ‘केशु’, Curious Georgeचा ‘उत्सुक गण्या’, Yellow Hat manचा ‘पिवळा फेटेवाला’, Doraची ‘दुर्गा’, Amelia Bedeliaची ‘अबोली बकुळ’, Janeची ‘जुई’, Treasure Hunt चं ‘खजिना’… असं बरंच काही! अगदी डे-केअरमुळे इंग्रजी अक्षरं ओळखायला यायला लागली तरीही प्रत्येक पुस्तकाचं मराठीतून एकदा तरी वाचन ठरलेलं असतं. याचा एक चांगला परिणाम असा दिसला, की आमची लेक प्रत्येक नवीन ऐकलेल्या बाहेरच्या गोष्टींना मराठीत काय म्हणू शकतो हा विचार करायला, विचारायला आणि त्याप्रमाणे बोलायला लागली. मग ‘पिक-बू’चा घरात ‘बुवा-कूक’, ‘हाय-फाय’चं ‘दे टाळी’ हे ओघात झालं. घरी मराठी बोलणं हे सक्तीचं असल्यामुळे पाळणाघरातल्या गंमती जंमती ती स्वाभाविकपणे भाषांतरित करुन सांगू लागली. ‘जॅक्सननी सगळीकडे रंग सांडून नुसता उपद्व्याप करुन ठेवला, वेडा कुठला!’, ‘आज आम्ही खेळातल्या मातीचा शंकू आणि पृथ्वी बनवली’ (Mess, Play-dough, Cone, Earth यांना चपखल शब्द वापरुन) तिने स्वतः केलेली ही मराठीतली वाक्यं!
भाषा ही सहजसाध्य कळेल तितकी पटकन जमते. लहान मुलं तर पटापट शिकत असतात. आपण लहानपणी ‘थ’ ‘थडग्या’चा, ‘ऐ’ ‘ऐरणी’चा शिकलो तेव्हा थोडीच खरी थडगी आणि ऐरण बघितली होती? मग आताच का मुलांना ‘अ’ ‘अननसा’चा न म्हणता ‘अमेरिके’चा, ‘न’ ‘नळा’चा न म्हणता ‘नायगारा’चा शिकवायचा? ज्याचे संदर्भ आजच्या काळात असतील ते जरुर शिकवूया पण आता संदर्भ नाहीत म्हणून काही गोष्टींना का वाळीत टाकायचं? एक शब्दसंपदा म्हणून नक्कीच त्याचा उपयोग होईल. या विचारांनी आम्ही मराठी वापरताना वर्ज्य काही नसावे ही भूमिका ठेवत गेलो. एकदा साई मंदिरात गेलो असताना होमकुंड बघून मुलगी पटकन म्हणाली, ‘आई तिकडे बघ यज्ञ’! लॉस अँजेलिसच्या अनुराधाताई आणि वामनकाका गानू यांनी तयार केलेल्या ‘परीच्या शाळे’तल्या गाण्यांसोबत डोलताना माझी लेक मराठी अक्षरं आम्ही न शिकवता कधी ओळखायला लागली ते कळलंही नाही. खोडकरपणा चालतो तेव्हा ‘कोणी खोडी काढली गं?’, ‘वात्रट पोगडीs…’, ‘ए ठकू…’ या लाडिकतेत ‘खोडी, वात्रट, ठकू म्हणजे रे काय भाऊ?’ हे वेगळं हात धरुन शिकवायला नाही लागलं. भरभरून दानाची परंपरा असणारी आपली संस्कृती मग मुलांच्या ओटीत भाषेचं वाण टाकताना शब्दांची काटकसर का? वेगवेगळे शब्द वापरुन, लवचिक वाक्यरचना करत आमची रात्री झोपायच्या आधीची गोष्ट चालते. झोपेतल्या स्वप्नात ती घरातल्या विश्वात असेल तर मराठीत बोलते आणि मित्र-मैत्रिणींमध्ये असेल तर इंग्रजीत. अनेक भाषा बोलणाऱ्या विद्वानाची मातृभाषा ओळखायच्या बिरबलाच्या गोष्टीसारखं झोपेत तिला मराठी बोलताना ऐकलं की फार बरं वाटतं.
खेळ, पुस्तक वाचन, गाणी गोष्टी याव्यतिरिक्त स्वयंपाकघरालाही आम्ही आमच्या मराठी प्रयोगशाळेत सामावून घेतलं. मी स्वयंपाक करायला लागले की बऱ्याचदा माझी मुलगी पायाशी यायची. तिला मी उचलून ओट्यावर कडेला बसवायची आणि कितपत कळेल असा विचार न करता चाललेल्या पाककलेचं वर्णन तिला ऐकवायची. काही महिन्यात ती मिसळणाच्या डब्यातले मसाले, भाज्या, स्वयंपाकाचे साहित्य हे (मराठी नावाने) ओळखायला लागली. यातलं सगळं तिला सातत्याशिवाय कायमचे लक्षात राहिलंच असं नाही पण वेळ पडेल तेव्हा आठवणींच्या कोपऱ्यातून डोकावेल, हे नक्की. याशिवाय मराठीत आम्ही झाडांशी बोलतो, काळोखात चांदोमामा – चांदण्यांशी गप्पाही मारतो. कधी मुंगळा आणि मुंगी यांचं निरीक्षण करुन झालं की त्यावर बोलताना नवलाईत ‘मुंगळी’ जन्माला घालतो तर ‘हनीबी’ला ‘मधमाशी’ ऐवजी मिस्किलपणे ‘बदमाषी’ करुन टाकतो आणि ‘काजूशाईन’ शब्दाची व्युत्पत्ती शोधत थकलो की आमच्या डोक्यात ‘काजवा’ पेटतो. चुकीचं वागलं की मात्र बाहेर मिळणाऱ्या Timeout पेक्षा घरात आम्ही ५ मिनिटे मांडी घालून, डोळे मिटून बाप्पासमोर शांतपणे ध्यान करतो.
अमेरिकेच्या धरतीला महाराष्ट्राची जोड म्हणून दोन वेळा अडीच-तीन महिन्याच्या भारतभेटी काढून आम्ही तिकडच्या मराठी बालवाडी – शिशुशाळाही गाठल्या. बांगड्या, टिकली आणि डोक्यात गजरा घालून नाचत आमची ठकू गणवेषात शाळेत जाऊन बसायची. अमेरिकन इंग्रजीला इथला ऍक्सेंट असला तरी तिच्या मराठीवरुन कोणाला कल्पनाही आली नाही की ही मुलगी अमेरिकेत वाढलेली आहे. शेतावरचा हुरडा, जत्रा, संक्रांत नंतर आषाढी, जन्माष्टमी, गणपती तिने तिथे अनुभवले. शाळेला जाता येता आमची आजूबाजूला दिसणाऱ्या झाडांची उजळणी व्हायची. त्यामुळे वड, पिंपळ, गुलमोहोर, कडुलिंब, चिंच, बुचाचं झाड ते आजीच्या बागेतली चाफा, अबोली, बोगनवेल, मोगरा आणि आंबा, काजू, पेरू, चिकू, केळीपासून ते डाळिंब, पपई, सीताफळ, शेवगा ही सगळी झाडं तिला ओळखता यायला लागली. इकडे आल्यावर गोष्टी ऐकताना हे कुठलं झाड हा प्रश्न तिला पडत नाही. इतक्यात आम्ही ‘श्यामची आई’ चित्रपट नमुनेदाखल बघायला घेतला तेव्हा तिला ‘वंदे मातरम्’, ‘छडी लागे छम छम’, ‘करुया भजन’ हे अजिबात परकं वाटलं नाही. तिचे अमेरिकन मित्र मैत्रिणी घरी आले तेव्हा चपला-बूट घालून देवघराच्या खोलीत जायचं नाही हे त्यांना ‘This is our prayer room’ म्हणून सांगायचंही उमगलं. ताईचं हे सगळं बघत आता आमचं दुसरं पिल्लूही याच वाटेला लागलंय!
‘एकदा का मुलं इथल्या शाळेत जायला लागली की खूप फरक पडतो’ असं अनेकांनी ऐकवलं. प्रतिकूल हवामानात जर हरितगृहांमध्ये (ग्रीन हाऊसमध्ये) झाडं छान वाढू शकतात, बेमोसमी फुलं, फळं देऊ शकतात तर मग याच संकल्पनेवर ‘बाह्य वातावरण’ आणि ‘घरातले संस्कार’ यांची योग्य सांगड घालत, प्रसंगी ‘नियंत्रित भावविश्व’ निर्माण करत अमेरिकेत मुलं मराठी का घडवता येऊ नयेत? तेव्हा जमेल आणि जमलंच पाहिजे. मराठी शिकवताना आमच्या मुलींबद्दल (ढोबळमानाने) त्यांच्या वयाचे टप्पे, मानसिकता हा दृष्टिकोन आम्ही अधिक ठेवला आहे. ५ वर्षापर्यंत व्यवस्थित शब्दोच्चारासह संभाषण, बडबडगीते, गाणी, गोष्टी, पाढे आणि अक्षरओळख. ८-१० वर्षापर्यंत बोधपर कहाण्या, चिंटू-चंपक-चांदोबा अशाप्रकारच्या मनोरंजक माध्यमातून वाचनाची गोडी, जोडीला कथन, उत्कंठावर्धक खेळ व कला. त्यानंतर वृत्तपत्रे, अवांतर वाचन, स्वगत लिखाण, स्वयंपूर्ण वक्तृत्व. यामध्ये श्रवणभक्ती तितकीच महत्वाची. ज्यात व्याख्याने, प्रवचन, संगीत, नाट्य, चित्रपट या सगळ्याचा समावेश येतो. त्यातून मग आपोआपच विचारसरणी घडते आणि जीवनमूल्ये रुजतात. देशात किंवा परदेशात कुठेही राहिलो तरी आपल्या मुलांना किमान ‘पु. लं’ आणि ‘शिवाजी महाराज’ कळलेच पाहिजेत हा आमचा प्रयत्न (खरं तर हट्ट) राहील. त्यापुढे जाऊन त्यांना साहित्यनिर्मिती, व्यासंग जमला तर सोन्याहून पिवळे. या सर्वांबरोबर मराठी सण, मराठमोळे जेवण, मराठी मुलखात भ्रमंती हे ही हवंच!
आमच्या घराच्या पुढच्या अंगणात एक प्रकारचा काटेरी वेल वाढताना नेहमी सापडतो. गेली चार एक वर्ष त्या तणाचे समूळ उच्चाटन करण्याचे आमचे सगळे प्रयत्न फसले. मागच्या आठवड्यात तो काटेरी वेल निरुपयोगी तण नसून ब्लॅकबेरीचा वेल आहे हा शोध आम्हाला लागला आणि ‘हाय रे कर्मा’ असं झालं. त्या ब्लॅकबेरीच्या चिकाटीचे कौतुक करावे तितके थोडे. मुलांना घरात मराठी संस्कारांत वाढवताना ऑफिसची कामं, घरकाम, आजारपणं, दुखणी खुपणी, ताण, क्वचित कंटाळा यामुळे आलेले व्यत्यय अशा अनेक काट्यातूनही आम्ही पुन्हा जोमाने सगळं सुरु करतो… अगदी त्या ब्लॅकबेरीच्या वेलासारखे. कारण आजचे किंचित काटेरी वाटणारे कष्ट, प्रयत्न भविष्यकाळात आपल्या भाषा संस्कृतीत चिंब न्हालेल्या गोड मुलांच्यारुपे आपल्यापुढे उभी राहण्यासारखं दुसरं सुख नाही!
.
Swara_Diwali_Killa_1
.
~ सायली मोकाटे-जोग
मार्च २०१७
.
(बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१७ स्मरणिकेत प्रकाशित)

4 thoughts on “मराठी (प्रयोग)शाळा

  1. खूप सुंदर लेख, एकदम जबरदस्त. परदेशात राहणाऱ्या किंवा खरं तर सर्वच मराठी लोकांनी हा लेख वाचायला पाहीजे 🙂

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s