माय मराठी

maayboli“ही मराठी कथा मागे सरकलीये की पुढे सरकतेय हे बघायला ही बया सरकारी शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेला गेली हो…!! “. व. पुं. च्या ‘भदे’ कथानकातली ‘कमला सोनटक्के’ या पात्रावरची ही ओळ आठवायला तसं खास कारण घडलं. मागच्या डिसेंबरमध्ये २ महिन्यांसाठी मी भारतात गेले होते. सोबत ऑफिसचे कामही होते. माझ्या पावणे दोन वर्षाच्या लेकीला अर्धा दिवस बालवाडीत ठेवावं असं घरी ठरलं.

सकाळी ९ च्या सुमारास ३-४ वर्षे वयोगटातील मुलामुलींच्या किलबिलाटाने भरलेल्या एका बालवाडीच्या व्यवस्थापिकेशी आम्ही बोलत होतो. भारतात असताना खरेदी वा पैशाशी संबंधित ठिकाणी मी सहसा आपण NRI आहोत हे आपणहून सांगत नाही… (कारण ते कळताच समोरची व्यक्ती अंतर्बाह्य बदलते आणि NRI दर लावून मोकळी होते! असो…) तर शहरातल्या सगळ्या टॉप कॉन्व्हेंट आणि इंग्लिश मीडियम शाळात आपली मुलं ‘सिलेक्ट’ होतात हे त्या अभिमानाने आम्हाला सांगत होत्या. “माझ्या लेकीला मला मराठी बालवाडीत घालायचंय…” मी म्हणाले. इतका वेळ भरभरून बोलणाऱ्या त्या व्यवस्थापिका एकदम चमकल्या आणि आमच्याकडे बघू लागल्या. “दिसायला बऱ्या घरच्या वाटतात तरी मराठीचं खूळ…?” त्यांच्या मनातला सूचक भाव मी ओळखला. “मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेय, पण शालेय शिक्षणाच्या माध्यमाने पुढच्या आयुष्यात माझं कुठे काहीच अडलं नाही.” माझ्या या बोलण्यावर मराठी की इंग्रजी यावर आमचा परिसंवाद रंगला. बोलताना मी (हरितपत्रधारी) अमेरिकनवासी भारतीय आहे हे कळल्यानंतर मात्र त्यांना माझं म्हणणं एकदम पटलं!
मातृभाषेतून मुलांचे प्राथमिक शिक्षण होणं उत्तम हे त्यांना पटवून देण्यासाठी माझा अमेरिकेशी असलेला संबंध कामी आला! महाराष्ट्रातल्या एका शहरातली शैक्षणिक क्षेत्रातली व्यक्ती ज्या अनास्थेने मराठीबद्दल बोलत होती, ते पाहून – व. पुं. ची कमला सोनटक्के ‘मराठीची प्रगती पाहायला अमेरिकेला का गेली…?’ हे कोडे मला त्या दिवशी उमगले! इंग्लिश शाळेचं जोरकस वेड सध्या महाराष्ट्रीय पालकांवर आरूढ आहे. ज्या समंजस व्यवस्थापिकेच्या बालवाडीत मी माझ्या लेकीला घातले त्यांनीही खंत बोलून दाखवली… इंग्लिशमिश्रीत मराठी बोलल्याशिवाय पालकांना खात्री वाटत नाही की आम्ही बालवाडी चालवू शकतो. बाकी या इंग्लिशच्या वेडापायी शुद्ध शाकाहारी घरातली मुलं बालवाडीत तालासुरात “पिझ्झा,पिझ्झा, पेप्परोनी…” गाताना पाहिली तेव्हा मलाच त्यांच्या पालकांवर हसायला झालं! ‘पिकतं तिथे उगवत नाही’ असं म्हणत मी माझ्या मनाचं समाधान करून घेतलं.
भारतातल्या त्या अनुभवानंतर इथे काही दिवसांपूर्वी, संध्याकाळचे फिरायला गेलो होतो. “तुम्ही मराठी का? आत्ता तुमचं बोलणं कानावर पडलं…” असं म्हणत आमच्याशी ओळख करून घेणाऱ्या एका मराठी युवतीने त्यांच्या घरचा एक गंमतीशीर किस्सा सांगितला. घरून काम करत असल्यामुळे तिने तिच्या दीड वर्षाच्या मुलासाठी मेक्सिकन नॅनीला ठेवलेले. मेक्सिकन नॅनीबरोबर केवळ इंग्रजी वा त्याबरोबर स्पॅनिश भाषासंस्कार मुलावर होण्याऐवजी त्या कुटुंबाने मेक्सिकन नॅनीवरच मराठीचे संस्कार करून टाकलेले! “He ate POLI, He ate BHAJI, AAJI wants to talk…” इथपासून ते छोटी छोटी मराठी वाक्यही त्यांची नॅनी बोलायला लागलेली… संस्कृती आणि संस्कारांची सुरुवात मुळात भाषेपासून होते. ‘आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी, आमुच्या घराघरात वाढते मराठी…’ हे अंगी पक्कं भिनलं की मग देश वा वेष कोणताही असो…
दुसरा एक किस्सा अस्सल पुणेरी आणि आता अमेरिकावासी झालेल्या मैत्रिणीच्या घरातला. तिच्याकडे गेलो होतो तेव्हा ती १६ सोमवारचं व्रत सोडायला बसली होती… नंतर गप्पा झाल्या. “डे केअरमुळे मराठी शिकवणं अवघड जातंय गं… मागे लागलं की बोलते मराठी पण अमेरिकन अॅक्सेंट येतो…” तिची तक्रार होती. “Pinapple म्हणजे काय? अननस… Apple म्हणजे सफरचंद…” मराठी शिकवणं अशा घोकंपट्टी अभ्यासाने चालू होतं… थोडक्या वेळात सविस्तर बोलायचं राहून गेलं. तिला मनापासून सांगायचं होतं… लहान मुलांना भाषेआधी भाव कळतात. रोजच्या नोकरी-धावपळीमुळे खूप जमलं नाही तरी रात्री एक गोष्ट पूर्ण मराठीतून सांग. गरज पडेल तेव्हा वापर इंग्रजी पण घराच्या उंबरठ्याआड फक्त मराठी राहू दे… नेम सोडू नकोस, घेतला माय मराठीचा वसा टाकू नकोस… तुझ्या चिमुकलीला (उच्चारासहित) नक्की चांगलं मराठी येईल… नव्हे आलं’च’ पाहिजे… हे माय मराठीचं व्रत तुम्हा आम्हा सर्वच अनिवासी मराठी जनांसाठी पारंपारिक व्रतवैकल्यांइतकंच महत्वाचे आहे!
.
~ सायली मोकाटे-जोग
मे २०१५

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s