गुड न्यूज, बॅड न्यूज

 

ऑस्टिन, शुक्रवार मार्च २८, २०१४. ठरवलेली किरकोळ कामं आणि एक डॉक्टरची नियोजित भेट उरकून मी गाडीत बसले तोच नवऱ्याचा इ-संदेश (मेसेज)… ‘वादळ आणि गारांचे वर्तमान आहे, काळजी घे आणि तडक घरी ये’. मी गाडीच्या बाहेर डोकावले. निरभ्र आकाश आणि लख्ख सूर्य! गारा…? त्या ही आत्ता? स्वतःशीच नकारार्थी मान डोलवत मी गाडी सुरु केली. पुढच्या शनिवारी घरी एक जुनी मैत्रिण सह-कुटुंब येणार होती. बाजूच्याच रस्त्यावर गांधी बझार होतं. पटकन धावती चक्कर मारून मग घरी जाऊया… मी मनाशी विचार केला आणि गाडी दुसऱ्या गल्लीत वळवली.

जेमतेम दुकानासमोर पोहोचते न पोहोचते तो आकाशात काळे ढग जमा होऊन सोसाट्याचा वारा सुटलेला. अमेरिकन हवामान अंदाज अचूक आहेत की… असं म्हणत मी दार उघडणार तोच ‘टप्प’…! आवाजाच्या दिशेने समोर पाहिले तर चन्या-मन्या बोराएवढा एक गारेचा खडा काचेवरून घरंगळला… बापरे, गारा…!! घाईने गाडी सुरु केली नि रस्त्यावर आले पण तोपर्यंत वादळ पावसाला जोर आला आणि बारक्या बारक्या गारांनी गाडीच्या टपावर ठेका धरायला सुरुवात केलेली. नवऱ्याची सूचना दुर्लक्षित केल्याचा पश्चात्ताप आणि दुसरीकडे डोळ्यांसमोर गारांनी खवले पडलेली गाडी असे चित्र उभे झाले… क्षणभर काहीच सुचेना. समोरचा सिग्नल पडला. थांबण्याखेरीज गत्यंतर नव्हतं. रस्त्याच्या कडेला असलेल्या पेट्रोलपंपाकडे नजर गेली. (मी ‘गॅस’ला ‘पेट्रोल’ आणि ‘ट्रंक’ला ‘डिकी’च म्हणते… असो!)
पेट्रोलपंपाखाली गाडी थांबवली तर गारांपासून वाचू या कल्पनेने मला आनंद झाला. फटकन चाके वळवून मी गाडी पंपामध्ये घुसवली… पण व्यर्थ… काही चतूर वाहनचालकांनी सगळ्या जागा आधीच पटकावल्या होत्या. ‘तडतडतडतड…!!’ गारांचा गाडीवर जोरदार कथ्थक चाललेला. पेट्रोलपंपात सुरक्षित जागा मिळेल ही आशा फोल ठरल्यामुळे मी पुरती अस्वस्थ. काय करावे? मधल्या एका पंपांच्या रांगेत दोन कमी लांबीच्या गाड्या उभ्या होत्या. समांतर पार्किंग करतो त्याप्रकाराने तिथे गाडी जराशी घुसवली तर गारांपासून थोडेतरी वाचू असं वाटलं. पुढं मागं करून मी अलगद गाडी त्या जागेत घातली. नेमकी त्याचवेळी पलिकडची एक गाडी तिची जागा मोकळी करत बाहेर पडली… “या पठ्ठ्याला २ मिनिटे आधी निघायला काय झाले होते?” मी चरफडले. हातातले ४ चाकीचे धूड एखाद्या शाळकरी मुलीने जागा पकडण्यासाठी उडी मारावी तसे मी दामटले.
अखेर जागा पटकावलीच असा आनंद घेते तोवर गाडीचं मागचं उजवीकडील चाक कुठेतरी अडकल्याचं ध्यानी आलं. आरश्यात पाहिलं. पेट्रोल पंपांना लागून असलेला संरक्षणाचा ३ फुटी पांढरा खांब माझ्याकडे दात विचकावून पहात होता… वळण घेताना मी पुरेसी त्रिज्या न ठेवल्याने गाडीच्या मागच्या दारावर त्याने चित्र काढलेलं होतं. पुढच्या काही सेकंदात पाऊस थांबला आणि स्वच्छ ऊन पडलं… जणू असं की काही क्षणांपूर्वी गारा पडल्याच नाहीत! गाडीच्या बाहेर येऊन पाहिलं तेव्हा समजलं की गाडीचं नुकसान करण्याइतक्या गारा मोठ्या नव्हत्याच मुळी… पण त्यापासून वाचण्याच्या माझ्या धांदलीत गाडीवर विनाकारण ओरखडा उठला होता.…
“तुझ्या बायकोने आज गाडीची किंमत कमी केलीये” असा प्रस्तावनावजा इ-संदेश नवऱ्याला पाठवून घरी निघाले तेव्हा भ्रमणध्वनी (सेलफोन) खणाणला. आदल्या दिवशी नवीन नोकरीसाठी मुलाखत दिलेल्या कंपनीची एजंट उसळत म्हणाली… “Congratulations, they liked you!! How soon can you join?”
घरी पोहोचले. “There is good news and there is a bad news”… नवऱ्याकडे वळून बघत मी म्हणाले. जवळपास शून्य वेगात घडलेला अपघात आणि एवढा मोठा ओरखडा? “There cannot be good news…” गाडीकडे बघत गंभीर चेहेऱ्याने नवरा उत्तरला. काही मिनिटे तशीच गेली. मघाशी निसर्गात अनुभवलेला काही क्षणांचा वादळी पाऊस जाऊन हास्य आणि उत्साहाचं आनंदी ऊन परत आमच्या घरात सांडलं… येणारा गुढीपाडवा आणि नव्या नोकरीवर रुजू होण्याच्या तयारीला मी लागले… ☺
.
~ सायली मोकाटे-जोग
जून २०१४

 

2 thoughts on “गुड न्यूज, बॅड न्यूज

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s