अब तक ..

बाळलीला, किशोरावस्था, सुरवंटाचं पाखरू असं होत पंचविशी आली की असणारा ‘लाथ मारीन तिथं पाणी काढीन’ असा जोश आणि खळखळाट, तिशी आली काहीसा समजदार बनतो. संसार, मुलं, जगरहाटी, भलंबुरं यासोबत स्थिरता, संथता याचीही काही प्रमाणात भर पडत असावी. तिशी ओलांडून पस्तीशीकडे वळताना प्रकृती व वाढतं वय अशी दोन्हीची स्थित्यंतरं फारशी जाणवत नसल्यामुळे असेल कदाचित, पण ‘अजूनही यौवनात मी’ हा फील राहतो. पस्तिशी ओलांडून चाळीशीत पोहोचताना मात्र काही आयुष्य मागे सरल्याचा आतवर कुठेतरी शोध चालू होत असावा. चाळीशी ते पन्नास पंचावन्न… संसारातून, मुलांमधून फुरसत आणि बरीचशी स्वावलंबी. फुरसतीच्या, मनस्वी इच्छेच्या अनेक गोष्टी करायला जमतील अशी…. साठीत सकृतदर्शनी निवृत्तीचे वेध, आजी-आजोबांच्या भूमिका, तरी त्यातही करण्यासारखे बरेचसे. सत्तर पंच्याहत्तरीनंतर स्वास्थ जपणूक, छंद सोबती, वानप्रस्थी अलिप्तता, अनुभवाचं भरभरून दान, गत आयुष्याचा आढावा, मुद्दाम येणाऱ्या आठवणी… असं बरंच काही!

शाळेत असताना मा. श्री. गिरीशराव बापट यांनी सांगितलेली गोष्ट आठवते. युद्धात तोफेचा मारा करताना म्हणे, त्याचा कोन बघणं खूप महत्वाचं असतं. कारण जागेवर तोफेचा २-५ अंशांनी बदलेला कोन प्रत्यक्षात मात्र तोफगोळा जमिनीवर पडताना त्यात काही मैलांचं अंतर पडू शकतं! ‘पुढच्या आयुष्यात काय करायचं याचं नियोजन अधांतरी न होता काटेकोर असावं म्हणजे इच्छित ध्येयाचा नेम अचूक साधता येतो’ हा त्याचा मतितार्थ. दरवर्षी मला वाढदिवसाचा दिवस उजाडला की, अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशी दोन्ही नियोजने माझ्या डोक्यात फेर धरू लागतात. काय करता येईल, काय करावं या विचारांची सापशिडी चालू होते. प्रत्यक्षात परिस्थितीजन्य वास्तवाचे फासे, सामोरे येणारे संघर्ष त्यात किती पाणी पुलाखालून वाहून गेलेलं असतं, हा हिसाब किताब निराळाच…
मी माझ्या गायनॅकोलॉजिस्टशी बोलताना सहज म्हणाले, “Considering I will live at least 70 years of healthy life, I am half way through… अजून कितीतरी गोष्टी आहेत ज्या मला या आयुष्यात करायच्यात, ज्यांचा मी श्रीगणेशाही केला नाहीये! आता तर त्यात माझ्या छोट्या चिमण्या पण आहेत.” ती हसून म्हणाली, “It happens, पुढचा विचार कर पण एक एक पाऊल टाकत…  म्हणजे थांबायचं शल्य वा ऊर फोडून धावण्याची धास्ती दोन्हीही होणार नाही आणि ७० च काय भरपूर जगशील तू!” हा किस्सा मागच्या वर्षीचा. तर एकंदरीत मला ३६ वर्षं पूर्ण होत आहेत…
हा ३६ आकडा मोठा गंमतशीर आहे. म्हटलं तर ‘३६ गुण जुळतात’ म्हटलं तर ‘एकमेकांशी ३६चा आकडा’. लहानपणी आईला मी विचारायचे, “आई, तुला आजीची म्हणजे तुझ्या आईची आठवण नाही का गं येत?” परवा माझी लेक मला घट्ट बिलगली आणि म्हणाली, “मी सांगणार आहे बाप्पाला माझी आई कधीच म्हातारी व्हायला नकोय म्हणून…” “येते ना गं, पण काळ असतो औषध सगळ्यावर, आता तुम्ही आहात, संसारात रमून जातो…” वरकरणी सहज बोलली असं वाटणारं आईचं ते उत्तर आज आठवताना उगाचंच कंठ दाटून आला… एका बाजूला आपली चिमुकली मोठी करता करता कधीतरी आपल्याला घडवणाऱ्यांना अलविदा करायचं हे आजरोजी अजिबात मान्य नसलेलं सत्य इथून पुढे हळूहळू पचवायला सुरू करायचा उंबरठा म्हणजे ३६?… उगाचंच विचारात कातर भाव आला की लगेच दुसरीकडनं हलकाफुलका विचार खिदळत यावा… हा ३६ चाच गुण… ६ च्या पल्याडने सेकंड इंनिंगचं सूतोवाच करून मन मात्र ३ च्या अल्याडहून तिशी अलिकडेच रमू पाहे, असं वाटणारं हे ३६ व्या वयाचं वळण!
म्हणावं तर हे सगळं दरवर्षीचंच आहे, मन कुठे कुठे रपेट मारून, ‘क्या खोया, क्या पाया’ असं जमा खर्चाचे हिशोब मांडून माघारी येतं… आजही तसंच काहीसं… कालच्या मातृदिनाच्या मुहूर्तावर जवळच्या गावी राहणाऱ्या सदाबहार मैत्रिणीकडे मायेचा पाहुणचार, फुलांनी डवरलेल्या बगिच्यात भटकंती, वैज्ञानिक संग्रहालयातून आमच्या ठक्यांबरोबर तारांगणाची सवारी, मागचा महिनाभर जिद्दीनं पूर्ण करत असलेले कॅम्प ग्लॅडिएटर पाहून नवऱ्याने खुशीत आणलेले ऍपल वॉच आणि बस, एक खास निमित्त… अब तक ३६!!
.
~ सायली मोकाटे-जोग
मे २०१८

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s