नयनरम्य संध्याकाळ

“केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचारण, मनुजा चातुर्य येतसे फार!” फिरण्याची मनस्वी आवड. मार्च २००८ मध्ये टोरोंटो पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना खालच्या शुभ्र बर्फाच्छादित कॅनडाचं दर्शन झालेलं. एप्रिलमध्ये कॅनडा वंडरलंड, CN Tower, नायगरा या ठिकाणी भेटी झाल्या. मे मध्ये टोरोंटो ‘सेंट्रल आयलंड’च्या भ्रमंतीचा योग आला.

‘ऑन्टोरिओ लेक’ म्हणजे कॅनडा आणि अमेरिका या दोन देशांच्या सीमांना लागून असणारं एक विस्तृत असं सरोवर. कॅनडाच्या बाजूचं टोरोंटो हे लेकला लागून असलेलं शहर. या टोरोंटो शहरास बिलगून असणारी आणि दक्षिणेला विशाल ऑन्टोरिओ लेकच्या पाण्यावर तरंगणारी लघुतम द्वीपे म्हणजेच ‘सेंट्रल आयलंड’.
रविवारचा तो दिवस उगवला – एक प्रसन्न भाव, स्वच्छ ऊन आणि निरभ्र आकाश घेऊन. मी, विभा आणि शैली सुट्टीची सकाळची कामे आटोपून दुपारनंतर ‘सेंट्रल आयलंड’ फिरण्यासाठी म्हणून निघालो. कॅनडाची सार्वजनिक वाहतूक खूपच नेमकी आणि सोयीस्कर आहे. ऑफिसकरिता आम्ही टोरोंटो ट्रान्झीट कमिशन (TTC)चे मासिक पास काढलेले. हे पास बस, ट्राम, भुयारी रेल्वे सगळ्यांना चालत. मी राहत होते तिथे जवळच Eglinton East हे TTC स्थानक होते. त्या रेल्वे स्थानकावरून आम्ही निघालो. क्वीन स्टेशनवर दक्षिणेकडे जाणारी (Southbound) गाडी पडकून साधारण साडेचार वाजता आम्ही युनियन स्थानकावर उतरलो. सेंट्रल आयलंडच्या बोटी जिथून निघतात त्या साऊथ हार्बर या ठिकाणी चालत येऊन पोहोचलो. पूर्वेकडचं Ward’s Island, पश्चिमकडेचं Hanlan’s Point आणि मधलं Central Island अशा ३ टोकांना जाणाऱ्या बोटी उभ्या होत्या. सेंट्रल आयलंडच्या बोटीवर चढलो.
थोड्याच वेळात हिरवीगार वनराई दृष्टीपथात दिसू लागली. आयलंडवर उतरलो. स्वाभाविक सौंदर्य आणि नैसर्गिकतेने चहुबाजूंनी हिरवा साज चढवलेली ती धरित्री खूप मोहक वाटत होती. लहान झाडी, अनेक मोठे वृक्ष तर होतेच. पण त्याबरोबर सुंदर, रंगीत फुलांच्या सजावटीने आयलंडचा दर्शनी भाग नटला होता. नकाशा बघून चालण्याची दिशा निश्चित करत होतो तोच पलीकडे झोपाळे दिसले आणि आम्ही तिघी त्या दिशेकडे वळलो. समोर घनदाट झाडी, पायाखाली हिरवाई, बाजूला Long Pond नावाचे तळे – त्यातले सुंदर, दिमाखदार हंस तळ्याची शोभा आणखीनच वाढवत होते. शुभ्र हंसांबरोबरच बदकं आणि गींज यांची सोबत चाललेली लुडबुड… आणि यासर्व अनुभूतीमध्ये आम्ही घेतलेले मुक्त झुले. काय वर्णन करावं!
‘इटकाझाडुझी’ अशा गंमतशीर नावाची कुल्फी घेऊन आम्ही पुढे निघालो. आजूबाजूची विविध रंगांची पाने, फुले, पाखरे, छोटीछोटी खेळांची ठिकाणे बघत पुढे चालत राहिलो. छोट्या पुलावरून चालत आम्ही पोहोचलो ते एका सुंदर बागेसमोर. बाग खूपच आखीव रेखीव आणि देखणी होती. वेगवेगळे कोरीव पुतळे, छोटी पाणतळी, कारंजी, सुरेख कातरलेल्या झाडांची वेलबुट्टी, रंगीन फुलांचे असंख्य बहर यांनी ती बाग खुलून आली होती. तिथे कडेला असलेल्या तळ्यात काही लोक मासेमारीचा आनंद लुटत होते. बागेमधून चालत आम्ही आयलंडच्या दक्षिणेकडे पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. आयलंडवर फिरण्यासाठी मिळणाऱ्या सायकलीची वेळ बंद झाली होती. तसेच पुढे लेककडे वळलो.
समोर शानदार क्षितीज दिसणारा ऑन्टोरिओ लेकचा एक स्वच्छ किनारा. सूर्यास्ताला अजून बराच वेळ होता. क्षितिजावर रंगांची मुक्त उधळण. दूरवर पाणीच पाणी आणि हा किनारा. अगदी अबोल होऊन फक्त बघत राहावं. आम्ही वाळूचा किल्ला बनवला. नंतर पाण्यात उतरलो. थंडगार पाणी. अगदी लहान होऊन खेळलो… सव्वासात वाजत आले होते. दुपारपासून स्वच्छ ऊन होते. पण आता अचानक आकाश ढगांनी भरून आले. दूरवर क्षितिजावरून मोठ्ठी वीज चमकली. कदाचित तिला हेवा वाटून आमचा फोटो काढण्याची इच्छा झाली असणार! ती जणू पाण्यातून उगवली आणि एकदम आकाशाकडे झेपावली. क्षणभर उरात धडकी भरवून गेली.
आम्ही किनाऱ्यावरुन निघालो आयलंडच्या पश्चिम टोकाकडे (Hanlan’s Point). कधी पाण्यात तर कधी वाळूत असे लांबवर चालत दुसऱ्या टोकाकडे आलो. आजूबाजूला कोणी नाही. अगदी एकटे आणि आनंदी असे आम्ही तीन जीव. आठ वाजले आणि पावसाला सुरुवात झाली. मोठे मोठे थेंब आणि गरजणारा वारा. पळत जाऊन एका विशाल मेपल वृक्षाखाली आडोसा घेतला. पावसाचा जोर कमी झाला तसे दुसऱ्या एका वाटेने अंदाजाने परत फिरलो. वाटेत थोडे लोक दिसत होते. मघाशी किनाऱ्यावरुन जेथून चालायला सुरुवात केली होती त्याच ठिकाणी पुन्हा एकदा पोहोचलो तेव्हा पावणे नऊ झालेले. रेस्टरूममध्ये जाऊन ताजेतवाने होऊन बाहेर आलो.
बघतो तर अहो आश्चर्यम्! पाऊस थांबला होता. दाटलेले ढग नाहीसे झाले होते आणि आकाशात दोन गडद इंद्रधनुष्ये उमटली होती. बरोबर मध्यभागी सूर्याची किरणे अडलेली आणि अर्धगोलाकार इंद्रधनुष्यांचे दोन भाग झालेले. किनाऱ्यावरुन दोन बाजूंना सोनेरी-केशरट-जांभळ्या रंगांच्या त्या आकाशावरची ही चमकदार दुहेरी इंद्रधनुची कमान आणि त्याचे पाण्यावर पडलेले प्रतिबिंब!! सूर्यास्तावेळच्या गंभीर पण नितळ शांततेतले ते तेजस्वी दृश्य! क्षणभर आम्ही स्तिमित झालो आणि पुढच्याच क्षणी आनंदाने अक्षरशः नाचू लागलो. निसर्ग आपली अप्रतिम कला खुल्या आभाळी रंगवत होता. आम्ही ती कॅमेरामध्ये पकडण्याची खटपट करत होतो. साक्षात कालिदास जर इथे असता तर मेघादूतासारखेच दिव्य काव्य जन्मले असते असाच जणू माहोल. देहभान विसरून त्या रंगांच्या खेळात आम्ही रममाण झालो. नजर हटत नव्हती. त्या दृश्याकडे अतृप्तासारखे बघतच आम्ही सेंट्रल आयलंडच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या Y ब्रीजकडे आलो.
लक्ष क्षितिजावर. अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंत… सव्वानऊ वाजत आले तसे अंधारून आले. अंधाराची छटा ल्यालेले ते गडद निळे-काळे पाणी आणि अफाट आकाश! क्षणभर आपल्याच क्षुद्रतेची जाणीव झाली. इतक्यात दूरवर एक जहाज चमकलं आणि मन गाऊ लागलं… “अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अमुच्या आशा… किनारा तुला पामरा!”
रात्र झालेली. परतीसाठी वळलो. लांबवर दिव्यांनी चमकणारा CN Tower दिसत होता… मानवनिर्मित मोहनगरीची निशाणी! परतीच्या बोटीसाठी चालतच आयलंडच्या दर्शनी भागाकडे आलो तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. पुढ्यात टोरोंटो शहर लक्ष दिव्यांनी उजळून निघालेले. रात्रीच्या वेळी पाण्यावर आपल्याच श्रीमंतीचा दिमाख मोठ्या खुबीने मिरवत ती नगरी लुभावून टाकत होती. CN Tower वर खास दिवाळी चालू होती. बोटीवर चढलो. मोहक गार वारे अंगावर घेत पुढे डेकवरून समोरचे सारे दृश्य मनात साठवत पोहोचलो हार्बर पॉईंटवर. रात्रीचे साडेदहा झालेले. वेगाने ट्रेन पकडली आणि नेहमीची यात्रा करत साडेअकराला घरी पोहोचलो.
मी गादीवर पडले. दुहेरी इंद्रधनुचा नयनमनोहर क्षण परत एकदा डोळ्यांसमोर तरळला. निसर्गराजाची भू-आकाशातली रंगांची किमया आणि मानवनिर्मित झगमगती दुनिया या संगमाचा मनोमन अनुभव घेत असतानाच थकल्याची जाणीव झाली आणि मी अलगद निद्राधीन झाले…!
.
.
~ सायली मोकाटे-जोग
सप्टेंबर २०११

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s