अग्नि

Agni-holi

अग्नि म्हटलं की पहिलं आठवतं ते सीतेचं अग्निदिव्य, स्वातंत्र्यवीरांची अग्निज्योतीवर हात ठेवून मातृभूमीसाठी प्रतिज्ञा आणि तप्त आगीच्या मुशीतून झळाळून येणारं अस्सल सोनं! आपल्या मनोकामना देवाधिकांपर्यंत पोहोचवणारा दूत म्हणून आपण अग्निदेवता पूज्य, पवित्र मानतो. राजा दशरथाच्या पुत्रकामेष्टी यज्ञातून पायसदान घेऊन प्रकट झालेला अग्निदेव, राजा द्रुपदाच्या यज्ञाग्नितून प्रगटलेले दृष्टद्युम्न व द्रौपदी अशी रामायण, महाभारतातली उदाहरणे आणि भारतीय संस्कृतीतील गृहस्थाश्रमाची सुरुवात अग्निसाक्ष!

अश्मयुगापासून मनुष्यप्राणी अग्निचा वापर करत आला आहे. रात्री प्रकाश, ऊब, वन्य प्राणांपासून संरक्षण, प्रसंगी अन्न शिजवणे ते शस्रास्रे बनवणे असा अनेकोपयोगी अग्नि. सूर्याचा दग्ध प्रखर अग्नि, आपले शरीर ज्या पंचमहाभूतांपासून बनलेले आहे त्यातलं एक तत्व अग्नि. रोजच्या जीवनातला उपयुक्त अग्नि, साहसी खेळातला ज्वलंत मोहक अग्नि, अनपेक्षित अपघाती भडकणारा दाहक अग्नि आणि रानावनांना भस्मसात करणारा संहारक वन्हि. शीलरक्षणार्थ जोहार अग्नि, सीमेवर स्वसंरक्षणार्थ निर्मिलेले अस्त्र अग्नि तर हिरोशिमा नागासाकीवर कोसळलेला विध्वंसकल्लोळ अग्निच. मनात खदखदणारा विकारस्वरूप क्रोधाग्नि, धगधगता सूडाग्नि आणि मृत्यूनंतर मिळणारा मुखाग्नि वा भडाग्नि!
या नाना रूपातल्या अग्निला पुरून उरणारा असा कोणता अग्नि असेल तो म्हणजे जठराग्नि. भूक ही जिवंत प्राणिमात्रांची ओळख आणि प्राथमिक गरज. प्रत्यक्ष ज्वाला, धूर वा बोलीभाषेत ‘कावळे ओरडणे’ यातले प्रत्यक्षात कोणतेही दृक-श्राव्य-गंध परिणाम न दाखवता पोटाचा कधीही न भरणारा खळगा प्रतिदिनी ठराविक काळाने घास मागत असतो.
आहुती घेतल्याखेरीज कोणताच अग्नि शांत होत नाही असा सृष्टीचा नियम असावा… होळी, राक्षसदहनात वाईट गोष्टींची आहुती तर सत्कार्यात संकल्पसिद्धीस्तव श्रीफल, घृत, नैवेद्यादिकांची…
या वैश्वानरासमवेत उरतो तो एकच भाव… अग्नये स्वाहा, इदं न मम् !

 

.
~ सायली मोकाटे-जोग
ऑगस्ट २०१८

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s