९/११

सप्टेंबर २००१. आमच्या महाविद्यालयीन बास्केटबॉलच्या मॅचेस जवळ आलेल्या असल्यामुळे आम्ही रोज सकाळी सरावाला सोलापूरच्या होम मैदानावर जमायचो. १२ सप्टेंबर २००१ ची सकाळ… दूरदर्शनवर बातम्या चालू होत्या. पायात बूट चढवताना मी डोळे बातमीकडे वळवले. चित्रात नजिक उभ्या २ उंच इमारती दिसत होत्या. पैकी एक इमारत डोक्याला जबर दुखापत झाल्यासारखी भासत धूर ओकताना दिसत होती, आणि त्याचवेळी नेम धरून वेगाने येणारे एक विमान एखाद्या उंच्यापुऱ्या व्यक्तीला कोणी पोटाच्या थोडं वर भोसकावं तसं त्या बाजूच्या दुसऱ्या इमारतीत दाणकन आदळताना दिसलं… प्रचंड स्फोट, ज्वाला आणि काळा धुराचा कल्लोळ!

बाss परे!!… नुसतं पाहून धस्स झालं. कानावर पडणारी पुढची बातमी पुरती डोक्यात शिरत नव्हती. एक विषण्णता मनात भरून गेली… का? कसं? आणि कश्यासाठी???…. अनेक प्रश्न, विचारांचा गुंता डोक्यात घेऊन मी मैदानावर पोहोचले.
बलाढ्य अमेरिकेच्या अस्मितेला नांगी मारत न्यूयॉर्क वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दिमाखात उभ्या इमारतींवर पळवलेली प्रवासी विमाने रोखून अतिरेक्यांनी धडाके घडवून आणले होते. मैदानावर मैत्रिणींपैकी एकीची मोठी बहीण अमेरिकेत राहात होती. ती सुरक्षित असल्याची बातमी मिळाली होती आणि बाईसाहेबांचा पट्टा चालू होता… “आमचा फोन लागला, ताई जिजू व्यवस्थित आहेत. पण ज्याने कोणी हे केलं असेल ना त्याला मानलं पाहिजे! काय सॉलिड आयडिया काढलीये, या अमेरिकेच्या अशी तोंडात मारून त्यांची खरंच जिरवली पाहिजे…”
ऐकलेलं तिचं ते वाक्य उकळतं तेल कुणी कानात घालावं तसं वाटलं… डोळ्यांसमोर ते पाहिलेलं दृश्य… मला गलबलायला लागलं. खरं तर त्यात माझं कोणी आप्त नव्हतं… त्यावेळी देश म्हणून अमेरिकेशीही विशेष सख्य नव्हतं… तरीही असं का होत होतं? एकवेळ अमेरिकेची राजकीय नीती त्यावर कुणाचा राग असणे इत्यादि गोष्ट मानली तरीही माझं मन ‘झालं ते बरं झालं’ हे स्वीकारायला अजिबात तयार नव्हतं…
‘ज्यांचा काहीही दोष नाही अशा हजारो निरपराध लोकांचा नृशंस या पद्धतीने घडवून आणणं’ समर्थनीय कसं असू शकेल? कोणत्याही सामाजिक कुचंबणेची, राजकीय द्वेषाची ही प्रतिक्रिया असूच शकत नाही… काय झालं असेल त्याक्षणी तिथे असलेल्या लोकांचं? भय, वेदना, आक्रंद? की काही कळायच्या आतच भस्म? अंगावर काटा उभा राहिला. यावेळी मानवतेखेरीज आणखी काहीच मनात येत नाही… त्यावेळीही नाही आज इतक्या वर्षांनीही नाहीच नाही…!!
.
~ सायली मोकाटे-जोग
सप्टेंबर २०१७

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s