श्रीगणेश विसर्जन

Dagdu Sheth Halwai pratikruti murtiत्यांचं चौकोनी कुटुंब. आई, बाबा आणि ती दोघं बहीण भाऊ. शाळेतून आली की दप्तरं टाकून बाहेर खेळायला… आज घरी आली ती नाचतच. त्यांच्या जवळ नव्याने झालेल्या इमारतीमुळे त्यांना खेळायला नवे सवंगडी मिळाले होते. नाही म्हणायला आसपासच्या चार पाच स्वतंत्र बंगल्यातली मुले होती तरी नव्याने झालेल्या इमारतीत एकूण ७-८ कुटुंब राहायला आली आणि खेळायला भरपूर मुलं जमली. आज तर तिथल्या एका काकांनी सामायिक वर्गणी जमवून छोटासा सार्वजनिक गणपती बसवूयात म्हणून प्रस्ताव मांडला होता आणि बच्चाकंपनीच्या उत्साहाला उधाण आलं होतं. सगळे घरच्यासारखे, आपुलकीच्या भावाचे… साधंसच पण खूप धमाल आली, पहिल्या वर्षी!

गल्लीत एक बडी असामी… सरकारी खात्यात वरची नोकरी अन पत्नी नगरसेविकेच्या निवडणुकीला उभी. दाराशी गाड्या, घोडे नि चाकर माणसे. समाजकार्याच्या उदात्त भावनेतून त्यांनी राजकीय ओळखीने दगडूशेठ हलवाईची प्रतिकृतीरूप मोठी गणेशमूर्ती मंडळाला भेट केली. विविधगुणदर्शन, मनोरंजन गाणी, गंमतजत्रा… त्यावर्षी गणपती दणक्यात साजरा झाला.
सर्वानुमते मोठी श्रीमूर्ती विसर्जित न करण्याचे ठरलं. योगायोगाने गणरायाची मोठी मूर्ती वर्षभर ठेवण्याची पर्यायी व्यवस्था दुसरीकडे मिळत नव्हती तेव्हा त्या दोघांच्या वडिलांनी त्यांच्या व्यावसायिक जागी सोय करून देऊ केली होती. त्यानंतरच्या प्रत्येक गणेशचतुर्थीला संध्याकाळी मंडळी तिथे जमायची. आरती, प्रसाद, नमस्कार करून सगळी खेळीमेळीने मस्त गप्पा मारत परत यायची. म्हणता म्हणता मास सरले, पुढच्या वर्षीचा गणपती बसला देखील. गेल्या वर्षीची मूर्ती नवीन रंगात विराजमान होती. मागच्या वर्षभरात लोकांमध्ये परस्पर मिलाफ वाढला होता. आई-वडिलांच्या हस्ते पहिली पूजा संपन्न झालेली त्यादिवशी प्रसाद वाटताना ती दोघं किती खूष होती!
भरगच्च कार्यक्रम, नेहमीसारखंच सगळं तरी का कोणास ठाऊक त्या दोघांच्या बालवयाला हळूहळू काहीतरी जाणवायला लागलं होतं. उघड कुणीच काही बोलत नव्हतं मात्र नक्की काहीतरी खुट्ट वाजलं होतं… अनंत चतुर्दशीचा दिवस… मंडपातल्या छोट्या मूर्तीचे विसर्जन झाले तरी मोठा बाप्पा मागच्या वर्षीसारखा आपल्याकडे… दोघंही स्वप्नाळू डोळ्यांनी उठली. सकाळी कोणीच त्यांच्याशी फारसं बोललं नाही. आरतीची हाकारी आली नाही की आवाज… उत्तरपूजा झालेली ही त्यांना कळलीच नाही…
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!! विसर्जनाच्या गाडीतून लोकं परतली तशी त्यांना बातमी लागली. दोघं कावरीबावरी होऊन घरीच आली… समोर आई-बाबांना बघून मोठीला रडूच फुटलं. ‘त्यांनी बाप्पाची मोठी मूर्ती विसर्जन केली… कुणीतरी कुजबुजत होतं म्हणे की ते काका आणि बाबाचं भांडण झालं म्हणून बाबा मूर्ती ठेवायला नाही म्हणालेत…’ आई-बाबांना तर यातलं काहीच माहिती नव्हतं.
‘हे बघ बाळा, आपण का नाही म्हणू बाप्पा ठेवायला आणि समजा तसं कारण असलं तरी त्यासाठी कुणाशी भांडायची काय गरज आहे?’ लेकीला शांत करत आई म्हणाली. त्या रात्री प्रक्षेपकावर चित्रपट लागणार होता पण ते चौघं घरीच थांबले. कोणाकडे गेलेही नाहीत ना नेहमीसारखं त्यांना कोणी बोलावलं. धाकटा तर रात्रीपर्यंत मुसमुसत होता जणू काही त्याच्याच घरातली कोणी व्यक्ती कायमची सोडून गेल्यासारखा. कशी बशी झोपली एकदाची दोघं.
‘गणेशमूर्ती वर्षभर आपल्याकडे ठेवून आपण कधी कुठला भाव खाल्ला नाही की कशात पुढे पुढे करून हक्क दाखवला… उलट सवय झाली होती मूर्ती असण्याची. रोज सकाळी देवपूजेबरोबर या मूर्तीचे पूजन. हे भांडण वगैरे…’ अस्वस्थ बाबांना समजत नव्हतं. ‘इतकी वर्ष इथे राहतोय, रोज भेटतो, बोलतो, एकाही कुटुंबाला आपल्याबद्दल विश्वास वाटू नये की एकदा विचारावं, असं काही कानावर आलंय ते खरं आहे का?’… आईला पार आतून दुखावलेलं…
मूर्ती भेट दिलेल्या असामीपेक्षा आपलं नाव मंडळाकडून यावेळी जास्तवेळा घेतलं गेलंय कदाचित हे पोटदुखीचं कारण की… ? कोणीही काहीही येऊन सांगेल, ऐकणाऱ्याला कळू नाही? इतकी सुंदरमूर्ती अशी तडकाफडकी विसर्जित…? कानगोष्टींच्या मार्गाने त्या खेळीमेळीच्या कौटुंबिक गणेशोत्सवात मागल्या दारानं राजकारण शिरलेलं हेच त्यातलं उरलेलं सत्य… तळमळ आणि भल्याबुऱ्या आठवणींच्या हिंदोळ्यावर विचारांची चक्र चालू राहिली… त्यातच कधीतरी डोळा लागला.
‘… करि डळमळ भूमंडळ’… स्वप्नांतही आरत्याच आठवताहेत की… छे! हा भूकंप… “अहो उठा, तुम्ही मुलांना घेऊन बाहेर या पटकन, मी पुढे जाऊन सगळ्यांना हाका मारते…”
“कोणाला हाका मारणार आहेस?”
… खरंच, विसरून गेले का मी, कालचे मुलांचे सुकलेले चेहेरे आणि ते सगळं कानावर आलेलं… विघ्नहर्त्या, तुझी ती प्रसन्नचित्त सुंदर मूर्ती… ते सगळं विसरून का मारावी हाक यांना?… असो, कोणी कसं का वागेना आपण आपला चांगुलपणाचा धर्म सोडता कामा नये…
‘अहो वाहिनी, ऐकलंत का, उठा भूकंप होतोय… वरच्या मजल्याचे राहणारे सगळे खाली या आधी मैदानात असाल तसे… किशा, उठ रे, तुझ्या बाईंना आणि साहेबांना उठव, लवकर बाहेर या… भूकंप होतोय’… पहाटेच्या हाकांनी परिसरात जाग आली. काल रात्री उशिरापर्यंत चालेल्या चित्रपटासाठी अंथरलेल्या ताडपत्रीवर सगळी कुटुंबं भयमिश्रित आणि विचित्र भावनेत एकत्र जमली…
१९९३ चा तो भयंकर भूकंप… अनंत चतुर्दशीनंतरची पहाट… व्यक्तिगत अहंकारात श्रीगणेशाची मूर्ती विसर्जित करण्याचं नाट्य रंगवणारे, भयगंडाने पुढचे ३ दिवस बंगल्यासमोरच्या गाडीत झोपत होते. समज-गैरसमज टक्करले होते… वास्तव म्हणून उरला होता तो स्पष्ट दिसणारा तडा… इमारतींना आणि परस्पर विश्वासालाही. कानगोष्टींनीं उधळलेला धुरळा आता धरणीमातेच्या पोटात विरलेला. सारं काही रिकामं भासत होतं… श्रीगणेशाच्या मंडपातल्या स्थानासारखंच!
.
~ सायली मोकाटे-जोग
सप्टेंबर २०१८

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s