केसरगंध

‘गुलाबी थंडी, पौर्णिमेचा पूर्ण चंद्रमा आणि काश्मीर… केशराच्या कोमल फुलपाकळ्यांतून पाझरणारा शीतल शशीप्रकाश! अविस्मरणीय असं दृश्य…’ हे वर्णन काही वर्षांपूर्वी कुठेसं वाचलं होतं.

निसर्गातल्या दुर्मिळ, मौलिक वनस्पती ठराविक ठिकाणी, विशिष्ठ हवामानानुरूप उगवतात. केरळला जाऊन आल्यावर तिथले वेलदोडा, मिरीवेल जसे खुणावू लागतात, याचं एखादं रोप आपल्या बागेत असावं असं वाटायला लागतं, तसंच हा ‘केशर’ नामक किडा प्रत्यक्ष काश्मीरला न जाताही ४ एक वर्षांपूर्वी अचानक डोक्यात वळवळायला लागला (त्या हौसेखातर कोणतीही उठाठेव करायच्या तयारीसह). आजच्या हरितगृहांच्या, कृषी क्रांतीच्या, अगदी वाळवंटात बहरणाऱ्या शेतीच्या जमान्यात बिनहवामानच्या प्रदेशात केशर… काय हरकत असावी?
समोर जगाचा नकाशा… जगातील सर्वाधिक (९६%) केशर निर्यात करणारा इराण देश, भारताचा सरताज केशर-काश्मीर आणि मध्य टेक्सस… वेगवेगळ्या रेखांशावरले प्रदेश, मात्र अक्षांश साधारण एकच की! मग ठरवलंच पक्कं, हा केशरप्रयोग करायचाच. ऑगस्टमध्ये लावले की, नोव्हेंबरच्या मध्यात हवेतला थंडावा झेलत केशराची फुलं फुलतात. साधारण आठवड्या-दहा दिवसात शेत फुलून येतं. प्रत्येक फुलातल्या केवळ ३ काड्या. त्यामुळे एकूणच लागणारं मोठं कामगार बळ म्हणून मौल्यवान ठरलेला हा ‘सॅफ्रॉन स्पाईस’. कित्येक दिवस वेळ मिळेल तेव्हा केशराच्या कंदांची माहिती पाहाणं, वाचणं. लागवड, प्रत्यक्ष शेती, इराणची केशर निर्यात-अर्थव्यवस्था, अमेरिकेतल्या काही हौशी लोकांचे कुंड्या, माळरानावरचे प्रयोग… असं बरंच काही.
अस्सल केशराचे कंद काळजीपूर्वक शोधून घ्यावे लागतात. तीन वर्षांपूर्वी पहिली ऑनलाईन केशर कंद खरेदी, लागवड… अनुभव तसा पहिलाच. मागच्या वर्षीही अशीच कुठलीतरी गडबड आणि खट्टू मी! इजा बिजा तिजा, तो सगळा घाट यावर्षी पुन्हा… यावेळी भाज्यांच्या वाफ्यात लावले तर केवढा बदाबदा पाऊस… जायचे कुजून, पुन्हा थोडी खट्टूच…
“ऐका नीट, त्या आळ्याशी नाचायला वा त्यात पाय ठेवायला अजिबात जायचं नाहीये, कळ्ळं?” बच्चाकंपनीला काढलेला अध्यादेश, घरात सर्वांना बातमी… केशरकंदांच्या फूट पालवीची! दिवाळी आली. सप्तरंगात केसरगंध बहरून यावा… रोज बागेत डोकवणं. दोन दिवस जरा थंडीत हलगर्जीपणा करून खवखवू घातलेला घसा, कालपासून झालंच नाही जाणं बागेत.
भाऊबीजेचे मामा, मामी आईकडे आलेले. त्यांना स्काईपवर बाग दाखवायचं निमित्त… झेंडूने फुललेले अंगण, पुढची बाग, मग भाजीमळा. सांगावं केशराचं की राखावं गुपित? आई गं, आश्चर्य-आनंदातिशयने जवळजवळ किंचाळलेच मी! सकाळपासून सारखं वाटत होतं बाहेर कोणीतरी बोलवतेय… आता तेच तर टुकूटुकू बघत होतं नं माझ्याकडे!!
क्रोकस सॅतिव्ह्स… विंटर क्रोकसचे भाऊबंद. लवेंडर, जांभळ्या रंगांची नाजूक फुलं… प्रत्येक फुललेल्या फुलात सोनेरी पराग आणि त्या मध्यातूनच बाहेर डोकवणाऱ्या लांबसडक रक्तकेशरी मंजिऱ्या!
A spice that is worth more than its weight in gold… ‘तारीफ करूं क्या उसकी, जिसने तुम्हे बनाया’…
बस्स, हे फूल अंगणी फुलावे!!
.
आज माझ्या अंगणात उमलेलं केशराचं हे पहिलं फूल!
Saffron flower bloomed in My Garden
.
~ सायली मोकाटे-जोग
नोव्हेंबर २०१८

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s