संक्रांत

शहराच्या मध्यभागी वडिलोपार्जित इस्टेट. सगळी भावंडे आपापल्या वाटणीच्या हिश्शात सुखाने संसार करत होते. म्हणाल तर स्वतंत्र तरी सुखदुःखात लागलं तर एकत्र. त्यातलंच हे एक चौकोनी कुटुंब. साहेबांची नोकरी, बाई गृहिणी. त्यांना दोन मुलं. मोठा मुलगा आईसारखा. गोरापान, दिसायला अगदी राजबिंडा. धाकटा मुलगा थोडा सावळा पण स्मार्ट. दोघेही हुशार. मोठा मुलगा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला शिकायला मुंबईला. धाकटा, नुकताच स्थानिक इंजिनीरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवलेला.

एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊन मोठा मुलगा घरी आला होता. घरच्यांसाठी तो डॉक्टर झाल्यात जमा असला तरी सगळेच निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. पुढे ओघाने येणारे पोस्टग्रॅज्युएशन, इंटर्नशिप असे अनेक प्लॅन्स चालू होते. ती पुन्हा धावपळ सुरू होणार होती. मेडिकलचा कष्टप्रद दिनक्रम, तुडुंब अभ्यास यातून मिळालेले ते थोडेसे निवांतपण. भोगीनंतरची संक्रांत. भज्जीची भाजी, कडक भाकरी, तिळगूळ, गुळाच्या पोळ्या… नातलगांची ये जा, घरातलं उल्हसित वातारण, आईवडिलांचा आनंद आणि अभिमान, सगळं कसं फुलून आलं होतं!
त्याच संध्याकाळी आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा मात्र घराला कुलूप होतं. शेजारी विचारफूस केली. चेहेऱ्यावरच्या आश्चर्यमिश्रित भावनेनं गांभीऱ्याचं रूप घेतलं. हॉस्पिटलशी पोहोचलो तेव्हा नातलग आणि डॉक्टरमित्रं जमलेले. सर्वांचेच चेहेरे चिंतित. पुढं होऊन आत डोकावलो तर नजरेस पडला तो नुकत्याच वेगवेगळ्या तपासण्या चाललेला बेडवरचा उघडा देह. हाका, पापण्यांची उघडझाप, लहानसहान थापट्या… नर्स-डॉक्टरांचे सातत्याने शुद्धीवर आणायचे प्रयत्न चालू होते. जरा नाजूक भागाला धक्का तसा क्षणभरच हलला. ठोके चालू म्हणून जीवंत अशी एकूणात स्थिती होती. मेंदूत धक्का बसलेला… अंतर्गत बराच रक्तस्राव झालेला. हृदय व्यवस्थित काम करत होतं अन्यथा जणू मृतावस्थेत. डॉक्टरांनी जमेल ती शर्थ केली पुढचे ३-४ तास. त्याचे सहाध्यायी जिगरी (आणि होऊ घालेले डॉक्टर) मित्र रडवेले झालेले. Severe brain hemorrhage… no chances of survival!
अकस्मात घडू नये असं घडलं होतं. अशाश्वततेच्या जगात समोर आलेलं सत्य कुणाला ना चुकलं, ना टाळता आलं. पहाटे देह ताब्यात आला. गुरुजी आले. त्याच्या सांगण्यावरून रितीप्रमाणे अचेतन देहाचे रुईच्या झाडाशी लग्न लावून तद्पश्चात भडाग्नी देत मोठ्या कष्टानं सर्वांनी अंत्यविधी उरकला. अग्निसोबतच ‘डॉक्टर झालेला मुलगा, यथावकाश दोनाचे चार’ हे सहजसाध्य गृहस्थी स्वप्न विरले, त्या आईबापाची अवस्था कोणालाच बघवत नव्हती.
घरापासून जेमतेम २ मिनिटावर पेट्रोल पंप. त्या वाटेवर करकरीत संध्याकाळी नियतीने क्रूर झडप घातली. मागून भरधाव येणाऱ्या फुल लोडेड ट्रकने उडवलं आणि डोक्याला जीवघेणा जबर मार बसला… “सकाळपासून मागे लागला होता, जरा बाहेर जाऊन येतो. सारखे थांबवत होतो आम्ही त्याला. संक्रांतीमुळे कोणी ना कोणी येत होतं. संध्याकाळी म्हणाला, पेट्रोल तरी भरून येतो, हा आलोच… आणि गेला तो गेलाच…” दहाव्याला हळवा पिता बोलला. त्यादिवशी आम्ही अर्धा तास लवकर त्यांच्याकडे गेलो असतो तर या माझ्या मित्राचा मुलगा आम्हाला पाहून रेंगाळला असता. ‘काका, काकू’ म्हणत बोलत बसला असता, कदाचित गप्पांमध्ये काळाची ती अमंगल वेळ टळलीही असती, तो जीवंत असता… आज काही अर्थ होता या ‘जर तर’ ला? कुठल्या सुकृताचं फळ असा गुणी, देखणा पुत्र पोटी आला? मात्र जन्मदात्यांना अल्पायुषी संतानाचं दु:ख मागे ठेवून निघून गेला? कुणी पुण्यात्मा की शापित यक्ष? की अनुत्तरित प्रश्नच जास्त?
एमबीबीएसचे निकाल लागले. बेटा अव्वल गुणांनी उत्तीर्ण झालेला. निकाल घ्यायला उरल्या होत्या त्याच्या अस्थी नि शोकाकुल परिवार. पंचनामा, त्यानंतर ट्रकवाल्यावरची पोलिस केस, तारीख पे तारीख चालली; प्रत्येकवेळी कोर्टात कोसळणाऱ्या बापाची कसोटी लावत. ड्रायव्हरला शिक्षा, ‘आईबापास धाकटा मुलगा आधार’ म्हणून कोर्टाकडून मोघम नुकसान भरपाई आणि तळमळीची असहाय्य थकबाकी घेऊन काळाच्या मलमपट्टीला सामोरे जात घरातल्या आठवणी माळ्यावर बंदिस्त झाल्या.
आमच्या त्या मित्र परिवारावर संक्रांत ओढवली. तरणाताठा पोर डोळ्यांसमोर गेला. “आई, हा आलोच मी ५ मिनिटात”… गेली दोन अधिक दशके दर संक्रांतीला सैरभैर झालेले हे मायबाप वेड्या मायेने लेकाची दूर गेलेली वाट आळवतात… मात्र ती वाट आणि येणारी प्रत्येक संक्रांत, डोळ्यांना लागलेल्या धारेत धूसरच असते…
~ सायली मोकाटे-जोग
जानेवारी २०१९

2 thoughts on “संक्रांत

  1. Oh…Mandarkaka var lihila ahes …chotya wayat evdhe milestones rachun thevlet tyani..i was a kid then.. khup kautuk karaycha amcha..athvun sarsarun kaata ala..ajunhee sagle kiti miss kartaat tyala..

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s