लिलिपुट कहाणी

तप्त उन्हाच्या असह्य लाटा… दूरवर फक्त भुरभुरीत माती. जीवाची काहिली थांबवायला जमिनीत कुठे गडप व्हावं पण आज ते ही शक्य नाहीये… नुसतीच लाही लाही… म्हणायला परिसरात एकच झाड… त्याची पाने पिवळी आणि शुष्क… मुळे कशीबशी तग धरून राहिलेली. सहारा आता त्या वरच्याचाच… राणीचा तर पत्ताही लागणं अवघड झालं होतं. तहानलेल्या, भाजणाऱ्या देहाने कमी का भटकंती केली होती तिच्या शोधार्थ? पण पदरी निराशाच. आता जीवात जीव असेपर्यंत या नश्वर देहातून उरलेल्या इच्छाशक्तीवर वंश जपावा ही कामना, प्रार्थना करण्यापलिकडे उरलं तरी काय होतं?

अर्धमिटल्या डोळ्यांना पुन्हा जाग… प्रार्थनेची समाधी की सुकत चाललेल्या कायेची ग्लानी? राणी सांगायची, ‘प्रार्थनेत खूप शक्ती असते. जिवाभावानं हाक मारलीत की वरचा तो ऐकतो आपलं’… छे! सब झूटच… ज्या मातीत चाललो, खेळलो, बागडलो पुन्हा त्याच मातीत… नव्याने कुठे जन्म असेल का ते ही झूटच? ही भयाण शांतता, ही अंधारी कसली? माझेच कान वाजताहेत की खरंच वारा रोरावतोय? आणि तो वरचा हसतोय का गडगडाटी? माझ्यासारख्या तुच्छ जीवाची गंमत… नव्हे कीव करत असावा… कोणी आमच्यासाठी अश्रू ढाळावा तरी का? टप्प… स्वतःच्या अगतिकतेवर टिपं ढाळावी इतकीही ओल राहिली नाही. हे भासणारे संगीत अखेरचेच… टप्प, टप्प, टप्प, टप्प…

हा परिचित गंध? आणि हा गारवा? मृतदेहातून बाहेर पडल्यावर इतकं साजिरं? कोण हलवतंय?
“राणी सरकार, दस्तुरखुद्द आपण?”… आणि मी… मी जीवंत?…
“वरच्याने ऐकली बरं, आपली प्रार्थना… चिंब पावसाने माळ भिजलाय आणि पाहिलंस का ते झाडही कसं तरारून डोलतंय. चला, नव्याने कामाला लागू, पुन्हा सारा परिसर पिंजून काढू, सोबत्यांची घडी बसवू, आपलं अखंडित राज्य… अन्नधान्याची बेगमी करायची आहे ना? तुझ्यासारखा तगडा गडी हवाच याकामी…”

खरोखरीच्या त्या धो धो पावसानं सगळं शांत, तृप्त केलं होतं. निपचितांना पुनरुज्जित केलं होतं. टपोऱ्या थेंबांचं आणि धारांचं नृत्य रंगलं होतं. भरलेलं आभाळ नुकतंच रितं झालं होतं, मृदगंधाची अत्तरबाजी करून… तापलेल्या सूर्याचं झाकलेलं मुख बाजूला सारून तो दाखवत होता सृजनत्वाचं इंद्रधनुष्य!! शुद्धीत आलेले ते सगळेच भान हरपून तयारीला लागले. केवढा तो उत्साह. कष्टाला कधी ना नव्हतीच त्यांची. धरतीला कोवळे लुसलुशीत कोंब फुटले. परिसर फुलला… फिरून बरकत आली. तो ही नियमित बरसत राहिला… सारं काही कुशल, नांदा गाजाया लागलं, छोट्यांच्या आगमनानं गजबजून गेलं आणि अखेर तो दिवस उगवला… त्या हिरवाई नेसलेल्या झाडाच्या शीतल छायेत त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या राणीची चमकती छत्रं पुन्हा वसली… फिरून नव्याने उभारणाऱ्या त्यांच्या अस्मितेची ग्वाही देणारी!!

~~~~~~~~

raani_mungi_chhatri

‘अभ्यास सोडून कुठं चित्त असतं गं तुझं?’
त्या इटुकल्या पिटुकल्या मुंग्या… लाल, तपकिरी चावऱ्या… त्यांच्या तोंडाला धार. बारकुळ्या, तुरुतुरु धावणाऱ्या (न चावणाऱ्या) काळ्या ‘टणटण्या’ मुंग्या… शिस्तीनं एकामागे एक चालणाऱ्या कामसू मुंग्यांच्या रांगेत पडलेल्या फटीत बोट फिरवलं की चुकायच्या रस्ता… थोडाच वेळ गोंधळ उडायचा त्यांचा, पण पुन्हा सुरळीत व्हायचं… आणि कामाचा आवाका केवढा… स्वतःच्या वजनाच्या दुप्पट, चौपट जिन्नस वाहून न्यायच्या. कुठे मेलेलं झुरळ, बागुर्डा सापडला तर सर्कस बघायला मिळायची त्यांची. पावसाळ्याआधी जत्रा जमायची… स्थलांतरणाची. पुढे थोडा लवाजमा, नंतर टपोऱ्या राणी मुंगींचा ताफा, अवतीभवती स्वरंक्षक मुंग्या, तिची अंडी वाहणारी खास व्यवस्था आणि त्यातून धावणारे गोलसर तुकतुकीत काळे दूधकिडे. या लगबगीत कामसू मुंग्या, सावध पावित्र्यात… उरलेल्या असंख्य अंड्यांवर गस्त ठेवून जबाबदारीनं. राणी मुंग्यांच्या मागोमाग बहुपदरी रांगेत हलायची यांची वसाहत. कापूस पिंजल्याप्रमाणे दिसणारी तांदुळाच्या दाण्याप्रमाणे भासणारी इवली इवली मुंग्यांची अंडी… पक्व होत आली की किंचित फुगायची आणि त्या पारदर्शक दुधाळ आवरणातून दिसायची आतली मुंग्यांची येऊ घातलेली बाळं!
यावर्षीच्या पावसाळ्यासुमारास टेक्ससच्या उन्हात तापलेल्या घरासमोरच्या बागेतल्या आळ्यातली अशीच एक कहाणी… अळंबीच्या (मश्रूम) छत्र्यांसोबतची… कल्पनेत, ‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा’च्या आठवणी उजळत, उकिडव्या पायांवर बसून टिपलेली!
~ सायली मोकाटे-जोग
नोव्हेंबर २०१८

2 thoughts on “लिलिपुट कहाणी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s