About

Sayali Mokate-Jogआईचं बोट धरून चालताना शालेय वयात मायमराठीच्या हिंदोळ्यावर स्वार झाले… वाचनाचं वेड लागलं आणि मराठी साहित्याचे उंच झुले मोहवू लागले. उन्हाळ्याच्या सुट्टीत ‘श्यामची आई’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘मृत्युंजय’, ‘ययाती’, समग्र ‘पुलं’… अशी वाचनाची गोडी लागली आणि ‘मायमराठी’वर प्रेम जडलं. मराठी साहित्याबरोबर प्रवासवर्णने, राजकारणावरचे अभ्यासपूर्ण लिखाणही आवडीने वाचले गेले. ग्रंथालयातून नवीन कादंबऱ्या, पुस्तकं घरी आली की अनेकदा अभियांत्रिकीच्या अभ्यासालाही दांडी मारून आधी वाचन पूर्ण मग फावल्या वेळात परीक्षा… इतकं! मोठे होत असताना ‘आयुष्य सुंदर आहे’ भावनेबरोबरच समाजातली दांभिकता, ढोंगीपणा आणि नागडं सत्य याचं दर्शन, जाणीव होत गेली तसं पूर्वीच्या वाचन संस्कारांनी लिहितं केलं.

माझं नाव सायली – ‘सायली’ हे वेलीवरचं छोटंसं, पांढरं, सुवासिक फूल. माझा जन्म ‘मे’ महिन्यातला. त्यावेळी आमच्या बागेत फुलणारा रक्तवर्णी ‘मे फ्लॉवर’ (‘वैशाख पुष्प’). विविधरंगी, अनेकगंधी अशा फुलांच्या हळुवारतेने मनात फुलणाऱ्या विचारांना मायमराठीच्या झुल्यावर गुंफायचा हा छंद!

साहस, भ्रमंती, संगीत जोडीला बागकाम, चित्रकला, पाककला आणि आता नव्याने करतेय ती शिवणकला! माझ्या दोन लेकींना वाढवत असताना, त्यांच्यासोबत पुन्हा घडताना नवनवीन अनेक गोष्टी शिकायची इच्छा आहे. लहानपणी आईचं बागकाम पाहताना रुजलेला विचार – जगात दोनच गोष्टी वाटूनही कमी होत नाहीत… एक म्हणजे ‘ज्ञान’ आणि दुसरी ‘झाडं’!

मनातल्या विचारपालवीच्या प्रगटीकरणासाठी निर्मिलेलं हे एक ठिकाण!

~ सायली मोकाटे-जोग


Avid reader, periodically write in Marathi. Apart from love for Marathi, I like adventure, traveling, music, painting, gardening and cooking. Now a days, I am learning sewing. I expect myself to always be enthusiastic, learning new things and add more here!

~ Sayali Mokate-Jog