केसरिया

“केसरिया, अरे, काय दशा करून घेतली आहेस तू? नाही झालं रे, तीन दिवस तुझ्याकडे बघायला. माझ्या पण चिमण्या आहेत ना घरात. एकाअर्थी, चुकलंच माझं. बघ ना, चांगले चार-पाच दिवसाचे पर्जन्यमान होते म्हणून खरं उचललं तुला. नेमका हुलकावणी देऊन हा पाऊस गायब झाला आणि तू असा उन्हात ताज्या जखमेबरोबर. पण आलंय ना आता माझ्या लक्षात… हे बघ, मला माहिती आहे, तू तग धरून आहेस…

Kesariyaaआठव, किती सुंदर फुलला होतास मागच्या वर्षी. थोडी गर्दी झाली म्हणून इथेच तर तीन फुटावर तुला हलवलंय. खरं तर छान रुजला होतास तू. पण वाटलं जरा अजून मोकळी जागा मिळाली तर आणखी बहरशील रे… ओढता न आल्यामुळे बरीच मोठी मुळे तुटलीत तुझी परवा… पण मूळ गठ्ठा चांगला शाबूत आहे. हा बाजूचा फ्लोरिबंडा बघ, कसा बावचळला आहे, तुला काय झालं म्हणून… तुझ्या केसरिया झुपक्यांना त्याच्या पांढऱ्या गेंदांची छटा, काय सुंदर दिसता दोघे? आणि या आळ्यातले बाकीचे सवंगडी – तो दुरंगी सोन्या, गुबगुबीत जांभळ्या, गुलाबू, पिटुकला लाल्या… आता त्यांना काय उत्तर देऊ मी? माझ्याच चुकीमुळे तू दगावलास? इतका धट्टाकट्टा असूनही? ते काही नाही… मी आतापासून रोज सकाळ संध्याकाळ सडा घालणारे… तुला जगायलाच हवं. माझ्या ठक्या येणारेत ना, तुझी फुलं वेचायला… अजिबात मरायचं नाहीये, कळलं ना…

बाजूचा जापनीज मेपल आठवतोय ना तुला? दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्यात करपला… नेमकी तब्येत नाजूक होती माझी, छोटीच्या वेळची. लक्षात आलं तेव्हा उशीर झाला होता. मेपल आधीच मनात खड्डा पाडून गेलाय. त्यात आता तू एकदम असा वाळून, सुकून, करपून गेलास? वर्षात कसा भरकन वाढलास, सगळ्यांबरोबर मिसळूनही गेलास… त्यातही तुझ्या भरघोस फुलांचं, आकर्षक रंगाचं असं खास वैशिष्ट्य… हो ना? आणि एवढं सगळं सोडून एकदम असा अबोल?… चालणार नाही हं. मरायचं बिरायचं तर अजिबात नाहीये, समजलं? हा बघ हा पहिला मगभरून सडा, कसा छान वाटला की नाही…”

“काय ग? मेलं की काय हे गुलाबाचं झाड? उगाच हलवायला सांगितलंस… आणि कुणाशी बोलतीयेस बागेत एकटीच?”

“एकटी नाही काही, या गुलाबाशीच बोलतेय. हे येणारे परत, मरणार नाहीये… फक्त रोज सकाळ संध्याकाळ आठवणीने याला मस्त पाण्याचा सडा मारायचा, मी सांगितलं आहे त्याला तसं!”

“Are you sure, हा जगेल?”
“अलबत! बघच…”

“बरं का रे केसरिया, थंडीनंतर निष्पर्ण झालेल्या आपल्या कढीपाल्याने काडी मोडताच गतप्राण झाल्याचे चिन्ह दाखवले होते, नाही का? त्यालाही बुडाशी दोन इटुकले पोपटी धुमारे फुटलेत!… ऐकतो आहेस नं माझं?”

“माऊ, पिल्या, बाबा, लवकर बाहेर या सगळे, आपल्या केसरियाला कोंब आलाय…” मध्यातल्या जाडसर देठावर ठसठशीत लालसर कोंबाची खूण झळकवली होती केसरियानं… आठवड्याभरातच…

“हा पाहिलास, आज इथून अजून एक फुटलाय…”

“आई, हे बघ… इथे पण आलाय एक कोंब…”
kesariya-paalavi

“हो गं माझी राणी… आता काळजीच नाही… मात्र महिनाभर अजिबात धक्का नाही लावायचा झाडाला. सरसरून अंगभरून पालवी फुटली ना त्याला की मी हलक्या हातांनी करेन त्याचं कटिंग. हुर्रे, अखेर हा केसरिया गुलाबो जगला तर! चला, म्हणा… लवकर मोठा हो, तुला पुन्हा खूप फुलं लागू देत, आम्ही तुला माया करणार आहोत, खतपाणी घालणार आहोत….!!”

केसरिया कोवळ्या पालवीतून आमच्याकडे बघून इतका गोड हसतोय म्हणून सांगू!

.
~ सायली मोकाटे-जोग
एप्रिल २०१८

Leave a comment